नाशिक : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले बी-बियाणे, खते, औषधे बनावट निघणे आणि त्यांचा काळाबाजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. या हंगामात जिल्ह्यात १९ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई झाली असून, त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
कृषी दुकानात तपासणी केल्यानंतर अनेक त्रुटी आढळून आल्या. दोन दिवसांपूर्वी हरसुलजवळ ट्रकने वाहतूक होताना तीन लाख रुपये किमतीचे बनावट खत जप्त करण्यात आले होते. तर, महिनाभरात आलेल्या तक्रारीनुसार जिल्ह्यातील दोन हजार कृषी दुकानांची तपासणी कृषी विभागाच्या भरारी पथकाने केली आहे.
जिल्ह्यात १७ भरारी पथक कार्यान्वित आहेत. कर्ज काढून शेतकरी बियाणे घेतात, पण बियाणे अनेक ठिकाणी बनावट निघत असल्याचे लक्षात येत आहे. भरारी पथक त्यामुळे अलर्ट झाले असले तरी चोरी, छुपे बनावट खत विक्री थांबलेली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
कुठे तक्रार करावी, भरपाई मिळते का ?
बनावट खत किंवा बनावट खत विक्री होत असेल तर नजीकच्या कृषी कार्यालयात तक्रार कराची. ऑनलाइनही तक्रार करता येते. बनावट बियाणे घेऊन फसवणूक झाली असेल तर संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यास भरपाई दिली जाते. वेळप्रसंगी भरपाईसाठी शासनाकडे देखील पत्रव्यवहार करता येऊ शकतो.
जिल्ह्यात बनावट बियाणे विकल्याच्या १२० तक्रारी
बनावट बियाणे विकल्याच्या जिल्ह्यात १२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १३ दुकानांमध्ये हलक्या दर्जाचे बियाणे व काही ठिकाणी खताची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. १९ कृषी दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असले तरी जवळपास ६० हून अधिक कृषी दुकानांना लेखी स्वरूपात समज देण्यात आली आहे. तर काही कृषीकेंद्र चालकांना नोटीस देण्यात आली आहे.
कारवाई, शिक्षा आणि दंडाची तरतूद काय?
बनावट खत प्रकरणी, दोषी व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि किमान पाच हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असेल, तर शिक्षेचा कालावधी आणि दंडाची रक्कम वाढू शकते. खतांमध्ये भेसळ करणे किंवा बनावट खत विकणे, हे एक गंभीर आर्थिक गुन्हे मानले जातात आणि त्यानुसार कठोर कारवाई केली जाते