पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४चा निकाल जाहीर केला आहे. यात एकूण ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले असून, त्यातील ५२० उमेदवार पुण्यातील आहेत. प्रशासकीय कारणास्तव तीन उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा सविस्तर मुलाखत कार्यक्रम www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी सेवा संवर्गातील २५८ पदांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे एकूण ८२८ पदांसाठी १ डिसेंबर २०२४ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. एमपीएससीने १८ मे रोजी कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ घेतली होती.
राज्यसेवा, वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवांच्या मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर होऊन मुलाखतीदेखील पूर्ण होऊन तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध झाल्या. कृषी सेवेचे मात्र निकालच रखडले होते. अखेर एमपीएससीने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येत आहे. मात्र, उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना गुणांची फेरपडताळणी करायची आहे त्यांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये मिळाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
पात्र उमेदवार
अमरावती ४६, छत्रपती संभाजीनगर १०३, नागपूर ४३, नाशिक ९७, नवी मुंबई १८, पुणे ५२०
