Join us

आधीच अवकाळी, बाजारभावाने शेतकरी संकटात, आता वीजदरात वाढ झाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:35 PM

कृषिपंपाच्या वीजदरात १२ टक्के वाढ केल्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणने जोरदार 'शॉक' दिला आहे.

नाशिक : उन्हाचा पारा ४० अंश पार झाल्याने सारेच असहा झाले असताना कृषिपंपांच्या वीजदरात १२ टक्के वाढ केल्याने शेतकऱ्यांना बसणारे चटके असह्य झाले आहेत. वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे. कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. कृषिपंपाच्या वीजदरात १२ टक्के वाढ केल्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणने जोरदार 'शॉक' दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षापासून संकटांचा सामना करीत आहे. नोव्हेंबरमध्ये बसलेला अवकाळी पावसाचा फटका, कांदा निर्यातबंदी, शेतीमालास न मिळणारा भाव यामुळे शेतकरी चिंतेत असताना वीजदरात १२ टक्के वाढ करून वीज कंपनीने मोठा शॉक दिला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील वाढ नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिल महिन्यापासून लागू झाली आहे.

या वीजदर वाढीमुळे वीज दरात ६ ते १२ टक्के वाढ होणार असून, स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही ग्राहकांवर पडणार आहे. हा आकार सर्व प्रकारच्या दरवाढीवर कमाल १० टक्क्यांपर्यंत आहे. आयोगाने मागील वर्षी महावितरणच्या वीजदर वाढीला मंजुरी दिली होती. ही दरवाढ आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांकरिता आहे. शेती पंपासाठी २०२२-२३ ला ३.३० रुपये प्रतियुनिट दर होता, २०२४-२५ ला हा दर ४.५६ रुपये प्रतियुनिट झाला आहे. उच्चदाब शेती पंपासाठी ४.२४ रुपये प्रतियुनिट दर होता. २०२४-२७ साठी तो ६.३८ रुपये झाला आहे. १ एप्रिल २०२३ या आर्थिक वर्षात जवळपास तीन टक्के वीज दरवाढ करण्यात आली. आता २०२४ या आर्थिक वर्षापासून ही दरवाढ सहा टक्के लागू करण्यात आली.

आता सौर कृषिपंप घेणेही अडचणीचे

घरघुती अन् कृषिपंपांच्या वीजदरात वाढ झाली असताना सौर कृषिपंपांच्या शेतकऱ्यांच्या हिस्स्यातील रकमेत सात ते बारा हजार रुपये वाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पीएम कुसुम सौर कृषिपंप योजना गेल्या चार वर्षापासून राबविण्यात येत आहे. सौरपंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात प्रथम क्रमाकावर असताना तसेच सौर ऊर्जेसाठी शासन अनेक प्रयत्न करीत असताना कृषिपंपांच्या शेतकऱ्यांच्या हिस्स्यातील रकमेत वाढ केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

 

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रपाणीभारनियमननाशिक