चंद्रपूर : इस्रायल देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम व नूतनीकरणाची कामे सुरू असून, या कामांसाठी कुशल आणि अनुभवी कामगारांची तातडीने गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील तरुणांसाठी इस्रायलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सिरॅमिक टायलिंग, ड्रायवॉल वर्क आणि मेसन (राजमिस्त्री) या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भरती केली जाणार आहे.
ही संपूर्ण भरती प्रक्रिया कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अंतर्गत राबवली जाणार असून, पात्र उमेदवारांना सुरक्षित आणि अधिकृत माध्यमातून परदेशात काम करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
इंग्रजी बोलता येणे अनिवार्य
इस्रायलमध्ये काम करताना परदेशी पर्यवेक्षक, अभियंते आणि सहकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराला साधे इंग्रजी बोलता, समजता आणि कामाशी संबंधित सूचना पाळता येणे अपेक्षित आहे.
इतर निकष, पात्रता काय ?
या भरतीसाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. संबंधित कामाचा प्रत्यक्ष अनुभव, कामाची गुणवत्ता आणि शिस्तबद्ध वर्तन याला विशेष महत्त्व दिले जाणार आहे. तसेच उमेदवाराकडे वैध पासपोर्ट आणि परदेशात काम करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
तरुणांना इस्रायलमध्ये नोकरीची संधी
इस्रायलमधील आधुनिक बांधकाम प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी भारतातील तरुणांना निवडले जाणार असून, या संधीमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कामाचा अनुभव मिळणार आहे. परदेशात काम करताना उत्तम वेतन, नियोजित कामाचे तास आणि चांगल्या राहणीमानाच्या सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कोणत्या क्षेत्रात किती पदांवर भरती
या भरती अंतर्गत सिरॅमिक टायलिंग क्षेत्रासाठी सर्वाधिक म्हणजेच एक हजार पदे उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच ड्रायवॉल वर्कसाठी ३०० आणि
मेसन म्हणजेच राजमिस्त्री कामासाठीही ३०० पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण १६०० पदांवर ही भरती होणार आहे.
दहावी उत्तीर्ण आवश्यक
या परदेशी नोकरीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण असलेले आणि बांधकाम क्षेत्राचे प्राथमिक ज्ञान असलेले उमेदवार या संधीसाठी पात्र ठरणार आहेत. शैक्षणिक पात्रतेची पडताळणी निवड प्रक्रियेदरम्यान केली जाणार आहे.
