पुणे : राज्यात गेल्या चार महिन्यांत भूमिअभिलेख विभागाने सुमारे ७० हजार मोजण्या पूर्ण केल्या आहेत. त्यात सर्वाधिक २६ हजार ६९३ मोजण्या पुणे विभागात पूर्ण करण्यात आल्या.
राज्यातील ३५८ पैकी २५५ तालुक्यांमध्ये मोजणीसाठी केवळ ६० दिवसांचा कालावधी लागत आहे, तर ५० तालुक्यांमध्ये हा कालावधी ९० ते १२० दिवस असून, तो कमी करण्यासाठी जादा कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती भूमिअभिलेख उपसंचालक (भूमापन) कमलाकर हट्टेकर यांनी दिली.
राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये मोजण्याची संख्या जास्त असल्याने अन्य विभागांतून ३२ कर्मचाऱ्यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश आहे.
राज्यात ३१ डिसेंबरअखेर एकूण ८८ हजार २४ जमीन मोजणी प्रकरणे शिल्लक होती. त्यापैकी ३१ मार्चअखेर ६३ हजार १४ मोजणी पूर्ण झाली आहे.
हे काम एकूण प्रकरणांच्या सुमारे ७२ टक्के आहे. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात मोजणी प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
मात्र, नागपूर गोंदिया समृद्धी महामार्ग, यवतमाळ येथील शक्तिपीठ महामार्ग तसेच नगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर या दोन तालुक्यांमधील मोजण्या तांत्रिक कारणास्तव रखडल्या होत्या.
त्यामुळे ७ मेपर्यंत ६९ हजार २७९ अर्थात ७९ टक्के मोजण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित १८ हजार ७४५ प्रकरणे लवकरच निकाली काढण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती हट्टेकर यांनी दिली.
जमिनींच्या मोजणीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या ई-मोजणी 'व्हर्जन २'मुळे मोजणीला वेग आला आहे. एकट्या मार्च महिन्यात राज्यात तब्बल ३९ हजारांहून अधिक विक्रमी मोजणी झाल्या आहेत. हा आजवरचा विक्रम आहे.
राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २५५ तालुक्यांमध्ये आता मोजणीला ६० दिवसांपेक्षा अधिक वेळ लागत नाही, तर मोजणींच्या संख्या अधिक असलेल्या १३ तालुक्यांमध्ये हा कालावधी ९० दिवसांच्या आत आणला आहे.
राज्यातील ९० ते १२० दिवस कालावधी लागत असलेल्या ५० तालुक्यांमध्ये जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर १५ तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या विभागांमधून ३२ भूकरमापक आणि सर्व्हेअरची २ वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मोजण्या वेगाने होत आहेत.
त्यात पुणे जिल्ह्यातील मुळशी, हवेली, शिरूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव, मावळ. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व माण. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, मालेगाव, निफाड, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व संगमनेर या तालुक्यांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यामध्ये झालेली मोजणी
विभाग | जमीन मोजणी | शिल्लक मोजणी |
पुणे | २६,६९३ | ८,४०९ |
कोकण | ८,५६२ | ८७८ |
नाशिक | ९,२९७ | ३,७९५ |
संभाजीनगर | ८,६०४ | ३,१५१ |
अमरावती | ८,५६४ | २,३८१ |
नागपूर | ७,५५९ | १३१ |
एकूण | ६९,२७९ | १८,७४५ |
जमीन मोजणीचा सरासरी कालावधी कमी करण्यासाठी राज्य स्तरावरून दररोज आढावा घेतला जात आहे. एका भूकरमापकाला महिन्यात सरासरी १५ दिवस प्रत्यक्ष मोजणी करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे हे साध्य करण्यासाठी प्रत्येक भूकरमापक प्रत्यक्ष मोजणीला गेला किंवा नाही याची तपासणी होते. त्यामुळे मोजण्यांचा वेग वाढला असून, नागपूर, जळगाव, ठाणे, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, रायगड या जिल्ह्यांमध्ये जमीन मोजणी ६० दिवसांतच होत आहे. - कमलाकर हट्टेकर, उपसंचालक (भूमापन), भूमिअभिलेख विभाग, पुणे
अधिक वाचा: जिल्हा परिषदेच्या या योजनेतून मिळणार शेती उपयोगी औजारे; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर