Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन विभागाचा महिला शेतकऱ्यांना घरपोच मोबदला; मिळणार सहा कोटी पंधरा लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:21 IST

सोलापूर ते तुळजापूर रेल्वे मार्गात ज्या महिला शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे, अशा महिलांशी संपर्क साधून त्यांना घरपोच मोबदला देण्याचा स्तुत्य उपक्रम भूसंपादन विभागाने हाती घेतला आहे.

बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : सोलापूर ते तुळजापूर रेल्वे मार्गात ज्या महिला शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे, अशा महिलांशी संपर्क साधून त्यांना घरपोच मोबदला देण्याचा स्तुत्य उपक्रम भूसंपादन विभागाने हाती घेतला आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून भूसंपादन अधिकारी अमोल भोसले यांनी महिलांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेतली.

तसेच संबंधित बँकेतील त्रुटी दूर करण्यासाठी महिलांचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला. दहा गावांतील पंधरा महिलांना शनिवारी ६ कोटी १५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे.

शासनाने शंभर दिवसांचा आराखडा जाहीर केला. यात महिलादिनी विशेष उपक्रम राबवण्याची सूचना केली आहे. सोलापूर ते तुळजापूर रेल्वे मार्गात सोलापूर शहर परिसरातील दहा गावांतील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे.

कसबे सोलापूर, बाळे, होनसळ, मुरारजी पेठ, मार्डी, सेवालाल नगर, देगाव, खेड आदी गावांतील पंधरा महिला ६ कोटी १५ लाख रुपये देणार आहोत. अवघ्या ३० दिवसांत घरपोच मोबदला मिळत आहे.

उद्या पैसे देणार आहोत, असा जेव्हा महिलांना निरोप दिला तर महिला गहिवरून आल्या. अनेक जणी भावुक होत पाणावलेल्या डोळ्यांनी आभार व्यक्त केले, अशी माहिती अमोल भोसले यांनी दिली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलादिनी महिला शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा निर्णय घेतला. भूसंपादन रक्कम देण्याची प्रक्रिया खूपच किचकट आहे. महिलांना प्रस्ताव कसा तयार करायचा, याची माहिती नसते. लाभार्थी अनेक महिला सध्या परगावी राहताहेत. अशा शेतकरी महिलांशी संपर्क साधून त्यांचा प्रस्ताव तयार करून घेतला. - अमोल भोसले, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी १ 

अधिक वाचा: ३० ते ४० वर्षे पडून असलेली सुमारे ५००० एकर जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

टॅग्स :महिलाशेतकरीरेल्वेसोलापूरशेतीजिल्हाधिकारीबँकमहिला दिन २०२५