रूपेश उत्तरवार
यवतमाळ : यंदा खरीप हंगामात संपूर्ण विदर्भामध्ये लागवडीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात कापूस वगळता इतर सर्व पिकांचे दर कोलमडले आहे. किमान आधारभूत किमतीमध्ये सरकार कापूस खरेदी करेल, या विश्वासावर शेतकरी कापसाची लागवड करण्याची शक्यता आहे. (kharif Season)
यातूनच बियाणे विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर दोन कोटी पॅकेट्स (एका पॅकेटचे वजन ४७५ ग्रॅम) कपाशी बियाण्यांची मागणी (Seed Demand) नोंदविली आहे. बियाण्यांची नोंदणी तीन ते चार महिने आधीच करावी लागते. त्या दृष्टीने बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्या बाजारपेठेतून मागणी नोंदवीत आहे.
कंपन्या धोरणही ठरवीत आहे. सध्या याच पद्धतीने येणाऱ्या काळात कुठल्या बियाण्यांची मागणी (Seed Demand) अधिक राहील यानुसार बुकिंग केले जाते.
कापूस उत्पादक प्रांतावर विक्रेत्यांच्या नजरा
* संपूर्ण राज्यात ३३० कंपन्या बियाण्याची विक्री करण्यासाठी तयारीत आहे. राज्यात सुमारे दोन कोटी पॅकेटस् बियाणे (Seed Demand) लागते. त्यानुसार याची नोंदही करण्यात येत आहे. कापूस उत्पादक प्रांत म्हणून विदर्भाकडे पाहिले जाते. * या ठिकाणी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये १५ ते २० टक्के क्षेत्र कापसाखाली अधिक येण्याची शक्यता नियोजन विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार कंपन्यांकडे बियाण्याची बुकिंग नोंदविली जात आहे.
मक्याचे क्षेत्र वाढणार
* विदर्भात मका लागवड होत नसला तरी याचे उत्पादन अधिक होत असल्याने शेतकरी मका लागवडीकडे वळण्याची शक्यता आहे. यातून मक्याच्या बियाण्यांची मागणी विक्रेत्यांकडून नोंदविली जात आहे. एक नवे पीक विदर्भात पाहायला मिळणार आहे.
* याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची मागणी होत असल्याने याला चांगला दर राहण्याची शक्यता आहे. संरक्षणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मोठी व्यवस्था करावी लागणार आहे.
तुरीचे क्षेत्र वाढेल, सोयाबीनचे क्षेत्र घटेल
* येत्या हंगामात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे. आंतरपीक म्हणून शेतकरी तुरीच्या बियाण्यांची मागणी (Seed Demand) मोठ्या प्रमाणात करीत आहेत. घरगुती बियाणे तुरीच्या लागवडीसाठी वापरले जाण्याची शक्य आहे, तर दुसरीकडे सोयाबीनचे दर कमालीचे घसरले आहेत.
* सोयाबीनचा पेरा १५ ते २० टक्क्याने कमी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. एकूणच लागवड करताना मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. हे ही वाचा सविस्तर : Kharif Season : यंदा खरीप हंगामासाठी ३०० कोटींची उलाढाल वाचा सविस्तर