Kapas Biyane Case : शेतकऱ्यांच्या मागे सध्या अनेक संकटे येत आहेत. याच काळात एक दिलासादायक बातमी यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. सदोष कापूस बियाण्यामुळे (Kapas Biyane) उत्पादन गमावलेल्या शेतकऱ्याला ग्राहक आयोगाने न्याय देत 'कावेरी सीड्स' (Kaveri Seeds) कंपनीला २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Cotton Seeds)
शेतकऱ्याच्या खांद्यावरची जबाबदारी ओळखत न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. (Grahak Aayoga)
सदोष कापूस बियाण्यामुळे उत्पादन न मिळाल्याच्या प्रकरणात यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने (Grahak Aayoga) शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देत तेलंगणातील 'कावेरी सीड्स' (Kaveri Seeds) कंपनीला दंड ठोठावला आहे. शासनाच्या तक्रार निवारण समितीनेही सदर बियाणे सदोष असल्याचा अहवाल दिला होता, हे विशेष.
मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील भास्कर वासुदेव चटकी यांनी मार्डी (ता. मारेगाव) येथील स्वामी कृषी केंद्रातून मनीमेकर-बीजी या कापसाच्या वाणाचे पाकीट घेतले होते.
अडीच हेक्टर क्षेत्रात हे बियाणे पेरणी करून मशागत करण्यात आली. तथापि, बोंडअळी आल्यामुळे भास्कर चटकी यांना कपाशीचे उत्पादन झाले नाही.
तक्रार निवारण समितीने चटकी यांच्या शेताला भेट देऊन अहवाल सादर केला. त्यामध्ये त्यांनी पेरलेले बियाणे सदोष असल्याचे नमूद केले. यासंदर्भात कंपनीकडे भरपाई मागितली असता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. (Grahak Aayoga)
ग्राहक आयोगात दाद
कंपनी, कृषी केंद्राकडून प्रतिसाद मिळत नसल्याने भास्कर चटकी यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर सुनावणी झाली.
यामध्ये कावेरी कंपनी निर्मित कपाशी बियाणे सदोष निघाल्याचे सिद्ध झाले.
अडीच लाख भरपाई द्यावी
शेतकरी भास्कर चटकी यांना कपाशीचे उत्पादन झाले नाही. त्यामुळे कावेरी सीड्स कंपनीने त्यांना दोन लाख ५२ हजार रुपये नुकसानभरपाई आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये द्यावे, असा आदेश आयोगाने दिला.
भास्कर चटकी यांचे ६८ क्विंटल कापसाचे नुकसान झाले. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून ८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली होती.
'नॉन बीटी' पेरली नाही
बीटीच्या पाकिटामध्ये नॉन बीटी बियाणे उपलब्ध करून दिले जाते. शेतकरी भास्कर चटकी यांनी नॉन बीटी पेरली नाही. जागा व्यापली जाते म्हणून ही बाब टाळण्यात आली, अशी बाजू कंपनीने आपल्या बचावासाठी मांडली होती.