भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केल्याने मोजणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
सध्या या विभागाकडे ४७२३ प्रकरणे शिल्लक असून, आगामी पावसाळ्याचे दिवस पाहता संप लवकर मिटला नाही तर दिवाळीनंतरच मोजण्यांचा मुहूर्त मिळणार, हे निश्चित आहे.
भूमिअभिलेख विभागातील कर्मचारी भरती २०१२ पासून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका आणि पदवी (सिव्हिल इंजिनिअर) अर्हता धारण असलेल्या उमेदवारांची निवड केली जाते; पण या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन मात्र लिपिकाचे आहे.
यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच संप केला आहे. शासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने तब्बल १२ दिवस उलटले तरी संप सुरूच आहे.
त्याचा परिणाम कामकाजावर झाला असून, मोजणीची कामे ठप्प झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी शेतीसह इतर ठिकाणची मोजणी करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. मात्र, संपामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या कालावधीतील प्रकरणे प्रलंबित
एक महिन्याच्या आतील - ८२६
दोन महिन्यांच्या आतील - १०५०
दोन महिन्यांवरील - ९०३
तीन महिन्यांवरील - १५९०
सहा महिन्यांवरील - ३०७
एक वर्षावरील - ४७
विभागाचे काम तीन पटीने वाढले असताना कर्मचारी संख्या कमी होत चालली आहे. इतर विभागांना सातव्या वेतन आयोगाच्या तांत्रिक वेतन श्रेणीप्रमाणे कर्मचारी द्यावेत. - युवराज चाळके, अध्यक्ष, भूमिअभिलेख कर्मचारी संघटना
अधिक वाचा: आता शेतरस्त्यांची सातबारावरही होणार नोंद; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर