Join us

तुम्ही पिताय ते पाणी शुद्ध आहे ना? अस्वच्छ पाण्यामुळे जलजन्य आजारांची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:18 PM

काळजी घेण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. अशातच सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी पिण्यात येते. तसेच पाणी टंचाईमुळे अनेक शेतकरी बांधव मिळेल ते पाणी पिण्यासाठी वापरत आहे. मात्र या बदलामुळे व अस्वच्छ पाण्याने विविध जीवघेणे जलजन्य आजार उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी शुद्धीकरण महत्त्वाचे असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार जीवघेणे ठरू शकतात. कारण यात अतिसाराची शक्यता अधिक असते. त्यामुळे घरगुती उपचारापेक्षा वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरते. या आजारावर उपचार उपलब्ध आहेत. आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार केले जातात.

ग्रामीण भागात अशुद्ध पाणीपुरवठ्याची शक्यता अधिक असल्याने त्रास वाटल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. कॉलरा, अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वर असे अनेक प्रकारचे रोग दूषित पाण्यामुळे होत असतात. यामुळे ब्लिचिंग पावडर घालून शुद्ध पाण्याचा वापर करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

पाण्यापासून होणारे आजार व लक्षणे

कॉलरा: ग्रामीण भागात सामान्यपणे दिसून येणारा टायफाइडनंतरचा हा दुसरा आजार आहे. जो अशुद्ध पाणी प्यायल्याने होतो. हा बॅक्टेरियाजन्य आजार असून, संसर्गाच्या काही दिवसात किंवा अगदी काही तासात कॉलरा घातक ठरू शकतो. पण, दहापैकी एकाला आजार जीवघेणा ठरतो.

टायफाइड : अशुद्ध पाण्यापासून पसरणारा आजार असून, दरवर्षी बहुतांश लोक टायफाइडमुळे आजारी पडतात.

डिसेंट्री (पेचीश) : हा जलयुक्त आजार आहे. यामुळे तीव्र अतिसार होतो. असुरक्षित अन्न आणि पाण्यातील जिवाणू यामुळे हा आजार होतो.

कावीळ : शिळे अन्न आणि अशुद्ध पाण्यामुळे हा आजार पसरतो. याचा थेट प्रभाव आपल्या यकृतावर पडतो.

निर्जतूक केलेल्या अथवा शुद्ध उकळून थंड केलेल्या पाण्याचा वापर करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. आजारी वाटल्यास घरात उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा - डॉ. नीलेश टापरे, वैद्यकीय अधीक्षक, खामगाव

असे करा घरच्या घरी पाणी शुद्ध 

साठवण आणि निवळणे : पाणी भांडयात गाळून, साठवून स्थिर ठेवल्यानंतर काही वेळ जाऊ दिला तर गाळ खाली बसतो. २४ तास स्थिर ठेवून पाणी वापरल्यास त्यातले ९० टक्के जंतू नष्ट झालेले असतात. तुरटी फिरवून ही क्रिया लवकर होते. 

साथीच्या काळात मात्र रासायनिक शुध्दीकरण केलेलेच बरे. पाणी साठवून, निवळून औषध टाकले तर आणखी चांगले. पण यात वेळ लागत असल्याने हे उपाय कमी वापरले जातात.

उकळणे : एकदा उकळी फुटल्यानंतर किमान पाच मिनिटे उकळत ठेवणे हा खात्रीचा उपाय आहे. पण मोठया प्रमाणावर करायचा झाल्यास हा खर्चीक उपाय आहे. त्यामुळे हा उपाय नेहमी परवडणारा नाही.

हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

टॅग्स :हेल्थ टिप्सपाणीशेतकरीआरोग्य