शासकीय कापूस खरेदी केंद्रावर सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर संघटित गुन्हेगारी (मोका) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. अन्यथा तहसीलदार यांना सहआरोपी करून खटला सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटना, स्वातंत्र्य भारत पक्ष यांनी श्रीरामपूर तहसीलदार यांना शुक्रवारी (दि.२६) दिले आहे.
स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेने अहिल्यानगर जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांना अखंड पाठपुरावा केल्याने जिल्ह्यात शासकीय शेतीमाल सोयाबीन, कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगांव येथे शासकीय (CCI) कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र एक महिना उशिराने सुरू करण्यात आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती.
शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रात विक्रीसाठी आणलेला कापूस ग्रेडचे कारण सांगून रीजेक्ट केला जातो. सीसीआय चे कापूस खरेदीसाठी २० प्रकारच्या ग्रेड आहेत असे असूनही कापूस रिजेक्ट केला जातो आहे. रिजेक्ट केलेला तोच कापूस कमी भावात खरेदी केला जातो. सोबत संबंधित शेतकऱ्यांचे बँक खाते, ७/१२ उतारा केंद्र चालकाकडून ताब्यात घेण्यात येतो आणि पुन्हा तोच रीजेक्ट केलेला कापूस सीसीआयला शासकीय हमीभावाने विकण्यात येत आहे.
अशाप्रकारे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट केली जाते आहे. शेतकऱ्यांचा रीजेक्ट केलेला कापूस ७ हजार रुपये क्विंटलने खरेदी करून सीसीआयला ८००० - ७८०० रुपये ने सीसीआयला विकण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना क्विंटल मागे १५० - २०० रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते, ७/१२ ताब्यात घेण्यात येत आहे.
यात सदर कापूस खरेदी केंद्र चालक व CCI चा ग्रेडर संगनमताने शेतकऱ्यांची अडवणूक करून शासकीय कापूस खरेदीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची प्रती क्विंटल १००० ते ८०० रुपये ची लूट करीत आहेत. याची चौकशी करून संबंधितांवर संघटित गुन्हेगारी (मोका) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.
दरम्यान चौकशी ३० डिसेंबर २५ पर्यंत करून अनागोंदी न थांबविल्यास शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष तीव्र आंदोलन करेल तसेच तहसीलदार यांना सहआरोपी करून खटला उभरेल असे तक्रार वजा निवेदन श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांना नायब तहसीलदार अ.श. राजवळ यांच्यामार्फत दिले आहे.
या निवेदनावर स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे, तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, कोमल वानखेडे, युवा आघाडीचे मयूर भनगडे, अशोक आव्हाड, मधुकर काकड, श्रीराम त्रिवेदी, रवी वानखेडे, बाबासाहेब गायकवाड, बाळासाहेब घोगरे, शीतल पोकळे, मंदा गमे, आशा महांकाळे, शिला वानखेडे व कापूस उत्पादक शेतकरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खाते, ७/१२ व बँकेची विड्रॉल स्लीप कोणालाही ताब्यात देऊ नये. अन्यथा असे बँक खाते ताब्यात देणाऱ्या शेतकऱ्यांना सहआरोपी करण्यात येईल. - निलेश शेडगे, जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना.
