Join us

शासनाच्या सर्व विभागांची व योजनांची माहिती आता सीएम डॅश बोर्डवर; काय आहे हा उपक्रम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:08 IST

CM Dashboard शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा.

मुंबई : शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा.

‘स्वॅस’ (SWaaS) या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये ३४ विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे सीएम डॅशबोर्ड सादरीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया उपस्थित होते.

सचिव डॉ. श्रीकर परदेशी, संचालक अनिल भंडारी यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅश बोर्ड जनतेला उपयुक्त ठरावा.

शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती, अद्ययावत माहिती, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये.

यामध्ये न्यायालय, कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असावी. https:// cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे.

हे संकेतस्थळ दिव्यांगानाही सहज हाताळता येणार असून  माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान विभागातंर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची ‘स्वॅस'(SWaaS) ही प्रणाली आहे.

या प्रणालीमध्ये राज्यातील ३४ संकेतस्थळांचा समावेश आहे यामध्ये इतर विभागांच्या संकेतस्थळांचाही समावेश वाढवा. ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया यांनी माहिती तंत्रज्ञान विभाग हा ‘सीएम डॅश बोर्ड व ‘स्वॅस'(SWaaS)  ही प्रणाली सातत्याने अद्यावत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

अधिक वाचा: देवगड हापूस आंब्यासाठी आता युनिक कोड; आंबा बागायतदारांना कसा होणार फायदा?

टॅग्स :मुख्यमंत्रीसरकारराज्य सरकारसरकारी योजनामहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसऑनलाइन