Join us

पिंप्री अवगनमध्ये शेतकऱ्याच्या परसबागेत बहरला 'व्हीएतनाम सुपर' फणस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 10:18 AM

ज्ञानदेवराव अवगण यांची आधुनिक परिपूर्ण पसरबाग

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथील अल्पभूधारक शेतकरी तसेच वेगवेगळे नवीन प्रयोग करण्याचा छंद असलेले ज्ञानदेवराव अवगण यांनी त्यांच्या परसबागेत व्हीएतनाम सुपर जातीच्या फणसाची लागवड केली आहे. त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरल्याने जणू परसबागेतूनच त्यांनी समृद्धीचा मार्ग शोधल्याचे वाटत आहे.

ज्ञानदेव अवगण हे वेगवेगळ्या प्रयोगांसाठीही प्रसिद्ध असून, केवळ सेंद्रिय शेतीचा अंगीकार करणारे शेतकरी म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या शेतीत आजवर वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून भरघोस उत्पादन घेण्याची किमयाही साधली आहे.

त्यांनी परसबागेमध्ये लागवड केलेल्या फळझाडांना कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी व खतांचा वापर केलेला नाही. शेणखत व पंचामृत यापासूनच निर्मित द्रावणाचीच फवारणी ज्ञानदेव अवगण करतात.

त्यामुळे ज्ञानदेव अवगण यांच्या परसबागेतील फळांना एक विशिष्ट चव आली आहे. मागील तीन वर्षांपूर्वी त्यांनी परसबागेत व्हीएतनाम सुपर जातीच्या फणसाची लागवड केली आणि त्यातून भरघोस उत्पादनही मिळविले.

कोलकात्यातून आणली कलम

• ज्ञानदेव अवगण यांनी कोलकाता येथील एका नर्सरीतून व्हिएतनाम सुपर जातीच्या फणसाचे आड लागवडीसाठी आणले होते. या आडापासून त्यांनी १० कलमा तयार करून परसबागेमध्ये लावल्या.

• या कलमांपासून तयार झालेल्या झाडांना तीन वर्षे पूर्ण आली असून, सर्वच फणसाची झाडे फळांनी लदबटून गेली आहेत.

एकेका झाडाला दोन क्विंटल माल

परसबागेत दहा कलमांची लागवड करून अवगन यांनी तयार केलेल्या व्हीएतनाम सुपर फणसाच्या झाडाला प्रत्येकी दोन क्विंटल माल लागला. त्यामुळे अवघ्या दहा झाडांपासून त्यांना भरघोस उत्पन्नही मिळाले. आता या झाडांचा माल थोड़ा कमी झाला आहे. शेतकयांनी शेताच्या बांधावर फणसाची लागवड केल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

फणसच नव्हे, इतरही फळांची विविध कलमे

ज्ञानदेव अचगण यांनी व्हीएतनाम सुपर फणसच नव्हे, तर वेगवेगळ्या जातीच्या फणसासह आंबा, मोसंबी, संत्रा, जांभूळ, कस्टर्ड अॅप्पल, बोर, जांब आदि फळांच्या बर्‍याच कलमा तयार केल्या आहेत. शेतकरी त्यांच्याकडून विविध जातीच्या फळांच्या कलमा घेऊन आपल्या शेतात किंवा शेताच्या बांधावर लावून उत्पन्नात मोठी वाढ करू शकतात.

हेही वाचा - भावाच्या सल्लाने राजेंद्र करताहेत शेती; मिश्र फळबागेतून उत्पन्नाची हमी

टॅग्स :फळेशेतकरीशेतीविदर्भवाशिम