आयुब मुल्लाखोची: हुमणी अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने ऊस, भुईमूग या पिकांचा रंगच बदलून पिके निस्तेज दिसू लागली आहेत. मुळावर आक्रमण करणारी ही अळी पिकांना लुळे बनविते आहे. यामुळे शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे.
मार्गदर्शक व आधार असणारा कृषी विभाग मात्र अळीच्या प्रादुर्भावाबाबत अजूनही जागृत झालेला दिसत नाही. त्यामुळे हा विभाग कधी जागा होणार अशी विचारणा शेतकरी करू लागला आहे.
जिल्ह्यात सुमारे १२ हजार एकरवरील पिकावर हुमणी किडीने हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कसेबसे सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये यांची टोकन केली.
ऊस लागणीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात सरी सोडून आंतरपिके केली आहेत. त्यानंतर आडसाली लावणी सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार ३९० हेक्टरवर लागणी झाल्या आहे.
जिल्ह्यात २ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस आहे. यातील जेथे माळरान आहे, पाणी साचण्याचे प्रमाण कमी आहे. अशा ठिकाणी असणाऱ्या उस, भुईमुगाच्या शेतात हुमणीने मुळ्या फस्त करण्याचा कार्यक्रम जोरात सुरू ठेवला आहे.
याची सुरुवातच लक्षात येण्यास उशीर होतो. त्यामुळे ऊस वाळून कोलमडू लागला अन् भुईमुगाची पाने पिवळी पडून सुकू लागतात. त्यानंतर हुमणी नियंत्रणासाठी कीटकनाशकचा वापर सुरू झाला आहे.
परंतु याचा वापर मुळांपर्यंत होत नसल्याने ही अळी शंभर टक्के नियंत्रणात येणे अवघड बनले आहे. त्यामुळे उसाचे १० ते १५ टक्के नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. उसाचे एकरी ३० हजार तर भुईमुगाचे एकरी २० हजार रुपयांचे नुकसान होणार आहे.
गेल्या पंधरा वीस दिवसांपासून हुमणीची चर्चा शिवारात सुरू आहे. परंतु शेतीला उत्पन्नाच्या वाढीसाठी किडीच्या बंदोबस्तासाठी मार्गदर्शन करणारा कृषी विभाग मात्र अजूनही जागृत झाला नसल्याच्या तक्रारी आहेत.
हुमणी कशी बनते?◼️ मादी अळी ५० ते ६० अंडी घालते.◼️ अंडी रंगाने पांढरी असतात.◼️ ही अंडी २ ते १२ दिवसांनी उबवतात.◼️ अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळीला हुमणी म्हणतात.◼️ काही दिवस ही अळी सेंद्रिय पदार्थांवर जगते, नंतर पिकांच्या मुळावर हल्ला करते. पिकांच्या मुळावरच त्यांची उपजीविका चालते.
उपाय काय?ऊस शेतीत फीप्रोनील व इमीडाक्लोप्रिड तर भुईमुगासाठी कार्बोफ्युरॉन या रासायनिक कीटकनाशकाचा तर बिवेरिया व मेटारायजम या जैविक कीटकनाशकाचा वापर करून हुमणी नियंत्रण करावी.
खरिपात लावलेला भुईमूग फुल कळीला आला असून, अचानकच त्याची पाने पिवळी पडून वाढ खुंटली आहे. हुमणी लागल्याचे उशिरा लक्षात आले. त्यानंतर आळवणी करून नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु नुकसान होणार आहे. - सर्जेराव मोहिते, शेतकरी संभापूर
हुमणी प्रादुर्भाव ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. नियंत्रणासाठी रासायनिक व जैविक कीटकनाशके वापरून शेतकरी नियंत्रण करू लागला आहे. मोठ्या पावसाची खूप गरज आहे. तसेच सोयाबीनवरही पाने कुरतडणारी अळी आली आहे. - सचिन पाटील, शेती मार्गदर्शक भादोले
अधिक वाचा: पशुसंवर्धन व्यवसायास 'कृषि समकक्ष दर्जा' शासन निर्णय आला; पशुपालकांना या ठिकाणी मिळणार सवलत