Join us
Daily Top 2Weekly Top 5

गहू पिकातील खत व पाणी व्यवस्थापन कसे कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:39 IST

शेतकरी बांधवांनी जर पेरणी पध्दती नुसार योग्य वाणांचा, सुधारीत लागवड व खत व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केला तर महाराष्ट्राची गहू उत्पादकता वाढविता येणे शक्य आहे.

गह उत्पादन करणाऱ्या देशामध्ये भारत देश आज दुसऱ्या क्रमांकावर असून भारतामध्ये जवळजवळ १०९.५२ मिलीयन टन गह उत्पादित केल्या जात आहे. देशाचा गहू उत्पादकता ३४.२४ क्विंटल प्रती हेक्टर इतकी आहे. परंतु महाराष्ट्र राज्याची आणि विदर्भ विभागाची सरासरी उत्पादकता ही देशाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. शेतकरी बांधवांनी जर पेरणी पध्दती नुसार योग्य वाणांचा, सुधारीत लागवड व खत व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केला तर महाराष्ट्राची गहू उत्पादकता वाढविता येणे शक्य आहे.

पेरणीपूर्वी माती परिक्षण करणे गरजेचे आहे. माती परिक्षणाद्वारे आपणांस मातीतील उपलब्धत अन्नद्रव्ये उदा. नत्र, स्फुरद, पालाश त्याचप्रमाणे सामु, विद्युत वाहकता, चुनखडीचे प्रमाण तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. बाबी समजतात. माती परिक्षणावरून पिकासाठी रासायनिक खताच्या मात्रा ठरविता येतात.

गहू पिकास रासायनिक खताची पहिली मात्रा पेरणीच्या वेळी दोन वाड्याची तिफण वापरून बियाण्यासोबतच द्यावी. बागायती वेळेवर पेरणीसाठी १०० ते १२० किलो नत्र, ५० ते ६० किलो स्फूरद आणि ५० ते ६० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. बागायती उशीरा पेरणीसाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. बागायती वेळेवर आणि उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास नत्र खताची अर्धी मात्रा आणि स्फूरद व पालाशची पूर्ण मात्रा पेरणी सोबतच द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा पेरणीनंतर २१ दिवसांनी ओलीत करतांना द्यावी. कोरडवाहू गहू, पेरणी करतांना नत्र व स्फुरदाची पूर्ण मात्रा म्हणजेच ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणी सोबतच द्यावी. कोरडवाहू गव्हास नत्र विभागून देवू नये. मर्यादित/अपुरा पाणी पुरवठा असल्यांस ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद ही दोनच खते प्रती हेक्टरी पेरणी सोबतच द्यावी.

पिकाच्या वाढीकरीता ज्याप्रमाणे नत्र, स्फूरद व पालाश या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सद्याच्या शेती पध्दतीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा वाढता वापर, पिकफेरपालटींचा अभाव, सेंद्रीय खतांच्या वापराचा अभाव, असंतुलीत खत वापर इत्यादीमुळे जमिनीत सुक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता दिसून येते. पिकांना संतुलीत प्रमाणात अन्नाद्रव्यांचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने सुक्ष्म व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या योग्य वापरामुळे पिक उत्पादनात वाढ होवून उत्पादनाची प्रत सुधारते.

पीक वाढीसाठी प्रत्येक सुक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य ठरलेले असते. त्यांच्या जागी दुसरे अन्नद्रव्ये घेवू शकत नाही. सुक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकांवर लागणारी मात्रा कमी प्रमाणात असली तरी पिकांच्या जीवनचक्रातील विविध जीव रासायनिक प्रक्रिया अधिक गतीमान करण्याचे कार्य प्रकाश संश्लेषण आणि हरितद्रव्ये निर्मिती इत्यादी सुक्ष्म अन्नंद्रव्यांच्या उपलब्धतेवरच अवलंबुन असते. एकूणच पिकवाढीच्या दृष्टिने सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपलब्धरतेवरच अवलंबुन असते. एकूण पिकवाढीच्या दृष्टीने सुक्ष्म अन्नद्रव्ये ही मुख्य अन्नद्रव्यांइतकीच महत्वाची आहे. पिक पोषणासाठी एकूण १७ अन्नद्रव्यांची आवश्याकता असते. जस्त, लोह, मॅगनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोयरीन आणि निकेल ह्या अन्द्रव्यांची पिकांना अल्प प्रमाणात गरज अराते म्हणून त्यांना शुक्ष्म् अन्नद्रव्ये असे संबोधले जाते. गंधक, मॅग्नेशियम व कॅल्शीयम या दुय्यम अन्नद्रव्यांची पिकांना आवश्यकता असते.

सुक्ष्म अन्नद्रव्यांचे फायदे१) पिकांची पाने हिरवीगार राहतात व ती पिवळी पडत नाहीत.२) पिकांच्या उत्पादनात वाढ होते.३) प्रकाश संश्लेषण जलद होते व पिकांची वाढ जोमाने होते.४) दाणे भरण्यास मदत होते.५) जीवाणूच्या वाढीसाठी मदत होते.६) रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नाद्रव्यांचा आवश्यकते नुसार वापर केल्यास पिकांच्या उत्पादनात अधिक वाढ दिसून येते. त्यामुळे मुख्य अन्नद्रव्यांचे पिकांद्वारे शोषण वाढून मुख्य अन्नद्रव्येयुक्त (नत्र, स्फुरद व पालाश) खतांची कार्यक्षमता वाढते. महाराष्ट्रामध्ये नुकताच केलेल्या सर्वेक्षण व माती परिक्षणानुसार सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यात प्रामुख्याने सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्ताची ३६ टक्के क्षेत्रात महाराष्ट्रात कमतरता दिसून आलेली आहे. तसेच लोह व बोरॉन आणि दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये प्रामुख्याने गंधकाची सुध्दा कमतरता काही प्रमाणात दिसून आलेली आहे.

जस्ताच्या कमतरतेची लक्षणे१) जस्ताच्या कमतरतेमुळे पाने लहान व अरूंद व निमुळती होतात.२) पाने लहान होवून शिरांमधील भाग पिवळा होतो.३) पाने ठिकठिकाणी गळतात व पानगळ होते.४) पिकांची वाढ खुंटते५) पिक फुलावर येण्यास व परिपक्के होण्यास उशिर होतो.

जस्ताच्या कमतरतेवरील उपायज्या जमीनीमध्ये माती परिक्षणानंतर जस्ताची कमतरता आढळून येते तेथे पेरणीचे वेळी १७-१८ किलो झींक सल्फेट खताबरोबर पेरून द्यावे किंवा ०.५ टक्के झिंक सल्फेटच्या द्रावणाची २ ते ३ वेळेस फवारणी करावी.

महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापिठात व अखिल भारतीय सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पांतर्गत विविध पिकांच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. त्याचा शेतकरी बंधूनी अवलंब करून पिकांना संतुलीत खते द्यावेत, तसेच सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचे प्रमाण दक्षता पातळीपेक्षा कमी असेल तेव्हाच त्याचा वापर करावा. जमीनीतून वापर किंवा फवारणी करून योग्य वेळी वापर करावा. सुक्ष्म अन्नद्रव्यांचा जमिनीतून वापर दर ३ ते ४ वर्षांनी करावा आणि ज्या सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल त्याचाच वापर करावा.

ओलीत व्यवस्थापनजमीनीच्या मगदुराप्रमाणे साधारणपणे १८ ते २० दिवसांच्या अंतराने गहू पिकास ओलीत करावे. पिक वाढीच्या नाजुक अवस्थेत पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. पिक वाढीच्या नाजुक अवस्था खालीलप्रमाणे आहेत व त्यानुसार ओलीत करणे फायदेशीर ठरते.

पिक वाढीच्या नाजुक अवस्थापेरणीनंतर दिवसवेळेवर ओलीत न दिल्यास उत्पन्नात येणारी घट (शेकडा प्रमाण)
मुकुट मुळे फुटण्याची अवस्था१८ ते २०३३ टक्के
जास्तीत जास्त फुटवे येण्याची अवस्था३० ते ३५११ टक्के
कांडी घरण्याची उशिरा अवस्था४५ ते ५०११ टक्के
फुलोरा अवस्था६५ ते ७०२५ टक्के
दाण्याची दुधाळ अवस्था८० ते ८५८.५ टक्के
दाण्यात चिक भरण्याची अवस्था९० ते ९५२.५ टक्के

मर्यादित पाणी पुरवठा असल्यास खालीलप्रमाणे ओलीत करावेएका ओलीताची सोय असल्यास - ४२ दिवसांनीदोन ओलीताची सोय असल्यास - २१ व ६५ दिवसांनीतीन ओलीताची सोय असल्यास - २१, ४२ व ६५ दिवसांनी

गहू संशोधन विभागडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला

टॅग्स :गहूपाणीखतेपीकरब्बीपेरणीशेतीशेतकरी