Join us
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजी, जादा दराने खतविक्री भोवली; विदर्भाच्या 'या' जिल्ह्यातील १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:19 IST

खतांची अनधिकृत साठेबाजी आणि विक्रीत अनियमितता करणाऱ्या १६ प्रमुख कृषी केंद्र धारकांवर कृषी विभागाने बुधवारी कारवाई केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात झालेल्या तातडीच्या सुनावणीनंतर १४ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर २ केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात खतांची अनधिकृत साठेबाजी आणि विक्रीत अनियमितता करणाऱ्या १६ प्रमुख कृषी केंद्र धारकांवर कृषी विभागाने बुधवारी कारवाई केली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात झालेल्या तातडीच्या सुनावणीनंतर १४ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर २ केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात खत विक्रीत मोठा गोंधळ सुरू होता. काही दुकानदार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त दराने खत विक्री करत होते, तर काही साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या होत्या.

या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी १५ एप्रिल रोजी दुपारी तातडीची सुनावणी बोलावली होती.

शेतकऱ्यांची फसवणूक किंवा खतांचा काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सर्व केंद्र चालकांनी प्रशासकीय शिस्त पाळावी, अन्यथा परवाना कायमचा रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी दिला आहे.

जादा खत खरेदी करणारे शेतकरीही चौकशीच्या फेऱ्यात

पॉस मशीनवर ज्या शेतकऱ्यांच्या नावे मोठ्या प्रमाणात खत खरेदीची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अधिकारी पिकाची स्थिती तपासत आहेत.

धान, मका आणि भाजीपाला पिकांची लागवड प्रत्यक्ष पाहिल्यावरच खत वापराची सत्यता पडताळली जात आहे. यामध्ये अनेक ठिकाणी संशयास्पद बाबी आढळल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

१३३ केंद्रांची तपासणी

१३३ केंद्रांची तपासणी करण्यात आली. खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने मागील १५ दिवसांत ही तपासणी केली आहे. गंभीर अनियमितता आढळल्याने ५२ कृषी केंद्रांना तातडीने 'विक्री बंद'चे आदेश दिले आहेत.

थेट बांधावर जाऊन चौकशी

रब्बी हंगामात मका आणि धान पिकाखालील क्षेत्र वाढल्याने युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मार्च अखेर युरियाचा साठा 'नील' झाल्याने, खरोखरच शेतकऱ्यांनी खत खरेदी केले की त्याचा काळाबाजार झाला, याची शंका प्रशासनाला आली.

या पार्श्वभूमीवर, तालुका कृषी अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण अधिकारी हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. त्यामुळे शेतकरी सुद्धा धास्तावले आहेत.

या केंद्रांवर झाली कारवाई

देसाईगंज तालुक्यातील नाकाडे कृषी केंद्र, कृषी विकास केंद्र, संजीवनी आणि किसान कृषी केंद्र, कुरखेडा तालुक्यातील महाराष्ट्र कृषी केंद्र, चामोर्शी येथील सी. डी. गांधी फर्टिलायझर, अहेरी येथील प्रकाश कृषी केंद्र, सिरोंचा येथील मल्लिकार्जुन, अयप्पा, गजानन, शारदा, महालक्ष्मी कृषी केंद्र, तसेच आरमोरी तालुक्यातील तावेडे कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे.

सुनावणीत नियमांचे उल्लंघन झाले सिद्ध

• देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा आणि आरमोरी तालुक्यातील एकूण १६ कृषी केंद्र चालकांना या सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात आली होती.

• कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे १४ केंद्रांवर निलंबनाची कुन्हाड कोसळली, तर समाधानकारक उत्तर देणाऱ्या २ केंद्रांना शेवटची ताकीद देण्यात आली.

• रासायनिक खतांची विक्री जादा दराने करू नका, अशा सूचना कृषी विभागातार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कृषी विभागाचे अधिकारी केंद्र चालकांवर देखरेखही ठेवत आहेत. येत्या खरीप हंगामात काय स्थिती राहते, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

English
हिंदी सारांश
Web Title : Fertilizer Black Marketing: Licenses of 14 Centers Suspended in Vidarbha

Web Summary : Gadchiroli suspends licenses of 14 agricultural centers for illegal fertilizer hoarding and overpricing. Authorities investigate farmers with excessive purchases, uncovering irregularities. 133 centers inspected, 52 ordered to halt sales, ensuring fair practices for Kharif season.
टॅग्स :खतेशेतकरीविदर्भसरकारशेती क्षेत्र