Join us

उष्णतेमुळे आंबा तयार होण्याची गती वाढली; कोकणात आंबा कॅनिंगला सुरवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:07 IST

Mango Canning उष्णतेमुळे आंबा तयार होत असल्याने एकाच वेळी आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आवक वाढली आहे.

रत्नागिरी : उष्णतेमुळे आंबा तयार होत असल्याने एकाच वेळी आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आवक वाढली आहे.

आवक वाढल्याने दरात घसरण झाली असून, पेटीला १,५०० ते २,५०० रुपये दर आहे. दराची चिंता भेडसावत असतानाच कॅनिंग सुरू झाल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे. कॅनिंगला ४० ते ४५ रुपये दर मिळत आहे.

दरवर्षी एप्रिलमध्ये कॅनिंग सुरू होते. बागायतदार निवडक आंबा वर्गवारीनुसार पेटीत भरतात उर्वरित आंबा किलोवर विक्री करतात.

पेटीत भरून आंबा मुंबईला विक्रीला पाठविल्यानंतर मिळणारा पेटीला दर, खर्च वजा करून हातात येणारी निव्वळ बाकी विचारात घेता चार, पाच, सहा डझनच्या पेट्या भरून उर्वरित आंबा किलोवर विक्री करता येते.

बागायतदारांसाठी ही जमेची बाजू असली तरी कॅनिंग सुरू झाल्यानंतर चोरीचे प्रमाण वाढते. किलोवर चोरी करून आंबा विक्री करणाऱ्यांचे फावते.

कॅनिंगमुळे खत व्यवस्थापनापासून आंबा काढणी, मार्केटला पाठविण्यापर्यंत बागायतदारांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. शिवाय आर्थिक खर्चही भरपूर होतो.

तुलनेने दर मिळाला तर केलेला खर्च तरी निघू शकतो. मात्र सध्या बाजारातील दर समाधानकारक नसल्यामुळे बागायदार आर्थिक संकटात आहेत.

आंबा राखणीसाठी बागेत राखणदार ठेवावे लागतात. त्यासाठी दरमहा १५ ते २० हजार रुपये पगार द्यावा लागतो. मात्र, प्रत्येकालाच नेपाळी ठेवणे शक्य नाही.

अशा बागा हेरून चोरी केली जाते. परिणामी बागायतदारांना रात्री तसेच दिवसा बागेत फिरून पहारा द्यावा लागत आहे.

अनेकदा चोरी केलेला आंबा स्वस्त दरात विकला जात असल्याने बाजारपेठेवरही त्याचा परणाम होत असल्याची खंत बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा: आंब्यातील फळकुज, साका आणि फळमाशीसाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीबाजारकाढणी पश्चात तंत्रज्ञानकाढणीरत्नागिरीमुंबईकोकण