दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. यंदा २०२५ साठी त्याची थीम "निरोगी शहरांसाठी निरोगी माती" आहे. शहरीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे मातीवर होणाऱ्या प्रभावावर लक्ष केंद्रित करणारा हा दिवस मातीचे महत्त्व आणि तिचे संवर्धन करण्याची आवश्यकता अधोरेखित करतो. माती अनेक महत्त्वाच्या पर्यावरणीय सेवांचे योगदान देते जसे की अन्न उत्पादन, पाणी गाळण, तापमान नियंत्रण आणि जैवविविधता संरक्षण.
माती ही खनिजे, सेंद्रिय पदार्थ, सूक्ष्मजीव, पाणी आणि हवा यांचे नैसर्गिक मिश्रण आहे. ही मातीच आपल्या शेतकऱ्यांना अन्नाचे उत्पादन करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे आपल्याला मातीतील सुपीकता टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे. यासाठी शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धती अवलंबणे, रासायनिक खतांचा वापर नियंत्रित करणे आणि पावसाचे पाणी साठवणे आवश्यक आहे.
मातीचे संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रिय खतांचा वापर, पीक फेरपालट, हिरवळीचे खत, मल्चिंग आणि पाणी व्यवस्थापन यासारख्या पद्धती मातीचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरतात. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून आपल्या शेतात शाश्वत शेती पद्धती अवलंबणे आणि मातीचे नियमित परीक्षण करणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, सरकार आणि संस्थांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. मृदा संवर्धन योजनांची अंमलबजावणी, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि शेतजमिनीच्या संरक्षणासाठी कठोर कायदे लागू करणे यामुळे मातीच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलता येतील.
मातीचे रक्षण आणि संवर्धन हे आपल्यासाठी आणि भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. "माती वाचवा भविष्य वाचवा" हा संदेश आजच्या काळाची गरज बनली आहे. शाश्वत शेती आणि मातीच्या योग्य व्यवस्थापनामुळे आपल्याला एक स्थिर आणि टिकाऊ भविष्य मिळू शकते.
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक, कृषि विद्या विभाग,
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय, दहेगाव ता. वैजापूर जि. छ. संभाजीनगर.
हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
