अशोक मोरे
साहेब, डोळ्यादेखत ट्रॅक्टर, रोटा, पेरणी यंत्र, दोन दुचाकी वाहून गेल्या.. विहीर बुजली, कांदा वाहून गेला डाळिंबाची ४०० झाडे जमीनदोस्त झाली. घर पडले. आयुष्याची कमाई एका रात्रीत वाहून गेली. अशा शब्दांत व्यथा मांडताना करंजीतील मारुती क्षेत्रे या तरुण शेतकऱ्याचे डोळे पाणावले होते.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या करंजी (ता. पाथर्डी) येथे रविवारी मध्यरात्री ढगफुटी झाली. १२ तास कोसळत असलेल्या पावसाने आलेल्या पुरात या भागातील पिके, घर, संसार, कपडे, भांडे सारे काही वाहून गेले. करंजीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भट्टेवाडी परिसरात पावसाचा जोर अधिक होता.
ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता मारुती क्षेत्रे या तरुणाने शेती व्यवसाय निवडला. संपूर्ण शेती सुधारित पद्धतीने करून उत्तम पिके घेतली. विहीर, सोलर, ट्रॅक्टर, सगळी अवजारे मेहनतीने उभी केली. रविवारी मध्यरात्री झोपेत असतानाच निसर्गाचा कोप झाला. जवळच असलेल्या डोंगरावर जणू आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता.
पहाटेच्या सुमारास पावसाने रौद्र रूप धारण केले. पुराने संपूर्ण परिसराला वेढा घातला. 'साहेब, माझ्या डोळ्यांसमोर ट्रॅक्टर, रोटावेटर, पेरणीयंत्र, दोन दुचाकी, घरातील वस्तू पुरात वाहून गेल्या. डोक्याला हात लावून पाहत होतो, पण निसर्गाच्या कोपापुढे मी हतबल होतो. शेतातील विहीर बुजली, सोलर बाजूला पडले. कांदा वाहून गेला.
डाळिंबाची ४०० झाडे पाहू वाटत नव्हती. या भागातील शेतकरी १० वर्षे मागे गेला. आयुष्याची कमाईच पुरात वाहून गेली..' असे सांगताना मारुतीचे डोळे पाणावले होते. करंजीतील अशा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या.