जमिनीच्या जडणघडणीत सेंद्रिय खतांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. परंतु शेणखत सेंद्रिय खते मिळण्याच्या मर्यादा असल्याने त्यांची जागा घेणारा पर्याय हवा होता. हा पर्याय हिरवळीच्या खताच्या रूपाने मिळाला आहे.
हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पाना सकट कोवळ्या फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढवलेली पिके फुलोऱ्यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे.
त्या वनस्पतींच्या हिरव्या अवशेषापासून तयार झालेल्या खतास 'हिरवळीचे खत' असे म्हणतात.
हिरवळीच्या खतासाठी घेतली जाणारी पिके
हिरवळीच्या पिकांमध्ये प्रामुख्याने ताग, धैंचा, गवार, मूग, चवळी, मटकी, उडीद, मेथी, लाख, वाटाणा, मसूर, शेवरी, गिरीपुष्प, लसूणघास, सुबाभूळ, बरसीम, करंज इत्यादी पिके घेतली जातात.
हिरवळीच्या खतांचे प्रकार
१) जागच्या जागी हिरवळीचे खत : जेव्हा हिरवळीच्या खताचे पीक शेतात सलग, मिश्र किंवा एखाद्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर शेतात नांगरून मिसळतात, तेव्हा त्याला जागच्या जागी हिरवळीचे खत म्हणतात.
यासाठी ताग, गवार, चवळी, धैंचा, मूग, मटकी, मेथी लाख, वाटाणा, मसूर, उडीद, कुळीथ, सेंजी, शेवरी, लसूणघास आणि बरसीम यासारख्या पिकांची निवड करावी.
२) हिरव्या कोवळ्या पानांचे खत : या पद्धतीमध्ये वनस्पतींच्या नाजूक, कोवळ्या हिरव्या फांद्या, पाने, पडीक जमिनीवर किंवा जंगलात वाढलेल्या झाडांपासून गोळा करतात किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लागवड करून त्यांच्यापासून मिळवतात.
अशा रितीने गोळा केलेला पानोळा प्रथम शेतात पसरवितात आणि लगेच नांगरटीत किंवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळतात. याने हिरवळीचे खत तयार होते.
या प्रकारामध्ये गिरीपुष्प (ग्लिरिसिडीया), शेवरी, करंज, सुबाभूळ, टाकळा, आयपोमिया कर्निया, तसेच रत्नागिरी जिल्ह्यात , किंजळ, कुडा, रुई, मोगली, एरंड यांची झाडे, झुडूपे पडीक जमिनीत वाढवून त्यांच्या हिरव्या पानांचा खतासाठी उत्तम प्रकारे वापर करतात.
हिरवळीच्या खतासाठी पिकांचे गुणधर्म अथवा निवड
हिरवळीच्या खतासाठी पिकांची निवड करण्यासाठी पिकांचे खालील गुणधर्म लक्षात घ्यावेत आणि मगच निवड करावी म्हणजे चांगला फायदा मिळेल.
१) हिरवळीचे पीक १ ते १.५ महिन्यात फुलोऱ्यावर येणारे असावे. म्हणजे पीक गाडून कुजून पुढील पिकास उपयोग होईल.२) पीक लवकर वाढणारे आणि भरपूर पालेदार व हिरवेगार म्हणजे त्यापासून भरपूर हरितद्रव्ये मिळणारे असावे.३) हिरवळीचे पीक द्विदल वर्गातील असावे. म्हणजे ही पिके हवेतील नत्र स्थिरीकरण करून जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढवितात.४) पीक कमी पाण्यावर येणारे आणि हलक्या जमिनीत जोमाने वाढणारे असावे.५) ह्या पिकांची मुळे जमिनीत खोलवर जाणारी असावी म्हणजे ती पिके खालील थरातून अन्नद्रव्ये घेतील.६) पिकाचे खोडास सुद्धा कोवळेपणा व लुसलुशीतपणा असावा म्हणजे कुजण्याची क्रिया लवकर होते.७) पिकास मोठी व जास्त पाने असावीत तसेच ते जलद वाढणारे असावे.८) पिकास सुरुवातीच्या काळात भरपूर पाने येणारी असावीत.९) पीक दाट पेरले तर सरळ वाढणारे असावे म्हणजे धाटे कोमल राहून लवकर कुजतील.
पीक निवडताना वरील गोष्टींचा विचार करता तागाचे पीक येथे फायद्याचे असून त्या खालोखाल उडीद, मूग, मटकी ही आहेत. याशिवाय भेंडी, गवार, भुईमूग, शेवरी, धैंच्या, ग्लिरिसिडीया, करंज ही पिके चांगली आहेत.
धैंचा आणि शेवरी ही पिके क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी उपयोगी असून क्षार नाहीसे होऊन पाटस्थळाखालील जमिनी परत लागवडीस आणता येतात. म्हणून ही क्षार जमिनीत वापरावीत. शेंगावर्गीय (द्विदल) पिके बेवडाकरिता पसंत करावीत. कारण त्या पिकांच्या मुळांवर नत्राच्या गाठी असतात. त्या गाठी हवेतील नत्र शोषण करतात. त्यामुळे जमिनीत नत्राचे प्रमाण वाढून जमीन सुपीक बनते.
ताग, हरभरा, गवार, उडीद, मूग ही पिके हिरवळीच्या खतांकरिता वापरली तर त्यापासून एक एकराला ४० गाड्या शेणखत दिल्यासारखे होते. पुढील पिकास हिरवळीच्या खतांचा वापर करावयाचा असतो.
तेव्हा त्याच जमिनीत हिरवळीची पिके पेरून तेथेच गाडावीत. म्हणजे कमी खर्चाचे होते. परंतु ज्या ठिकाणी ही पिके करणे शक्य नाही अशा ठिकाणी झाडाचा पाला कापून गाडल्यास चांगले खत मिळते.
हिरवळीच्या पिकांचे फायदे
१) जमिनीस नत्र, स्फुरद व पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविली जाऊन पिकांना त्याची उपलब्धता वाढते.२) हिरवळीची पिके जमिनी गाडल्यानंतर जमिनीत सेंद्रिय द्रव्यांची भर पडून उपलब्धता वाढते. त्यामुळे सूक्ष्म जीवाणूंची वाढ चांगली होऊन त्यांची कार्यशक्ती वाढते. जमिनीतील मूळ अन्नद्रव्यांची उपलब्धताही वाढते.३) जमिनीत पावसाचे पाणी साठविण्याची जलधारणाशक्ती वाढून पाणी वाहून जाणे कमी होते आणि त्याचबरोबर पाण्यामुळे होणारी जमिनीची धूपही कमी होते. पिकास लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा निचरा होत नाही.४) पिकांच्या दाट वाढीमुळे तणांची वाढ होत नाही. तणांचे प्रमाण ७० ते ८०% कमी होते. म्हणजे तणांचा नायनाट होण्यास मदत होते. तसेच थंड जमिनीत उष्णता वाढून बी रुजण्यास मदत होते.५) हिरवळीची पिके शेंगावर्गीय (द्विदल वर्गीय) असतील तर ही पिके हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठवले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.६) हिरवळीचे पीक जमिनीच्या खालच्या थरातून नत्र शोषून घेते व पीक गाडल्यानंतर नत्राची उपलब्धता वरील थरात वाढते.७) जमीन मशागतीस भुसभुशीत होते. त्यामुळे पिकांच्या मुळ्या खोलवर वाढण्यास वाव मिळून पीक चांगले येऊन उत्पादनात भर पडते.८) क्षार जमिनीत वरचेवर हिरवळीचे पीक गाडल्याने जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीस आणता येतील.९) जमिनीतील रासायनिक क्रिया जोरात सुरू होऊन पोषक द्रव्ये विरघळणारी बनून ती पिकांना घेण्याच्या स्थितीत येतात.१०) चिकणवट जमिनीतील चिकटपणा कमी होतो तर वालुकामय जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहतो.११) हिरवळीच्या खतातील पोषणद्रव्ये सेंद्रिय खताप्रमाणेच पिकास हळूहळू उपलब्ध होतात आणि ती जमिनीमध्ये २ ते ३ वर्षे टिकून राहून चांगला परिणाम दिसून येतो.१२) हिरवळीची पिके कुजताना जी उष्णता निर्माण होते, त्या उष्णतेने जमिनीतील अनेक उपद्रवी किडींचा नाश होतो.१३) पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास मदत होते.१४) हिरवळीच्या खतामुळे सेंद्रिय स्फुरद पिकांना लवकर उपलब्ध होतो. कारण हिरवळीच्या खताची पिके जमिनीतील असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फुरदात रूपांतर करतात. अशा प्रकारे जमिनीत बद्ध झालेल्या स्फुरदाची उपलब्धता या हिरवळीच्या खतामुळे वाढते.
हिरवळीचे खत कसे तयार करावे ?
हिरवळीचे खत चांगल्या रितीने तयार करण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करावा.
१) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याचे वेळी हिरवळीचे पीक फुलोऱ्यात आलेले असावे. ही पिके साधारणपणे ६ ते ८ आठवड्यात फुलोऱ्यात येतात. शेवरी, ग्लिरिसिडीया या पिकांची पाने खत तयार करतेवेळी बाहेरून आणून जमिनीत नांगरामागे टाकून गाडावीत. इतर पिके मात्र ज्या जमिनीत घेतली असतील तेथेच खत तयार करावे.२) नुकतेच फुलोऱ्यात आलेल्या हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी.३) लोखंडी नांगराने तास घेऊन नांगराच्या प्रत्येक सरीमध्ये कापलेले हिरवळीचे पीक समप्रमाणात टाकावे.४) अशा प्रकारे टाकलेले हिरवळीचे पीक नांगराच्या दुसऱ्या तासाच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी.५) हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरून फळी किंवा मैंद फिरवावा. त्यामुळे गाडलेला माल पूर्णपणे झाकला वा दाबला जाऊन हिरवळ कुजण्याची क्रिया जलद सुरू होते. पिकाचा कोणताही भाग उघडा राहिला किंवा आत पोकळी राहिली तर आतील भाग वाळतो. त्यामुळे तो लवकर कुजत नाही. त्यासाठी मैद फिरविल्यास जमीन दाबली जाऊन आतील माल कुजण्यास मदत होते.६) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो. म्हणून जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीत ओलावा कमी असेल तर वरून एक मोकाट पाणी द्यावे. त्यामुळे हिरवळीचे पीक लवकर कुजण्यास मदत होते.७) सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून, जुलैमध्ये करून ऑगस्टमध्ये गाडणी करावी.
अशाप्रकारे योग्य हाताळणी केल्यास हिरवळीची पिके जमिनीत गाडल्यानंतर साधारणपणे १ ते १.५ महिन्यात कुजली जाऊन खत तयार होते.
हिरवळीच्या खत लागवडीसाठी उपयुक्त पिके
१) ताग : ताग हे सर्वात परिचित असलेले उत्तम हिरवळीचे पीक असून हिरवळीच्या खतासाठी त्याचा नेहमीच उपयोग केला जातो. हे सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढते. मात्र पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही.
पावसाळ्याच्या सुरुवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे. तयार केलेल्या शेतात फेकून जमिनीत मिसळावे. पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलोऱ्यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० सें.मी. वाढले असताना नांगराच्या साह्याने जमिनीत गाडून टाकावे. तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.७% इतके असून या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळू शकते.
२) ग्लिरिसिडीया (गिरीपुष्प) : ग्लिरिसिडीया (गिरीपुष्प) हे मध्यम आकाराचे झाड असून कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये निरनिराळ्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात चांगले येऊ शकते. या झाडाची लागवड दोन प्रकारे करतात. पहिल्या पद्धतीत छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० सें.मी. लांब, २ ते ३ सें.मी. जाडीची दोन छाट कलमे निवडावीत आणि पावसाळ्याच्या सुरुवातीस ३०×३०×३० सें.मी. वर खड्डा करून बांधावर लागवड करावी.
दुसऱ्या पद्धतीने बिया पेरून लागवड करायची असल्यास वाफे तयार करून त्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात बिया सारख्या प्रमाणात पेरून रोपे ५ आठवड्यांची झाली असताना पावसाच्या सुरुवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत.
पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून दुसऱ्या वर्षापासून पुढे प्रत्येक झाडापासून प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा पाला मिळू शकतो. या झाडाच्या फांद्यांची वरचेवर छाटणी करूनही या झाडांना नवीन फूट येते आणि त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते.
ताग आणि धैंचा यांच्या तुलनेत या झाडांच्या पानामध्ये सर्वाधिक म्हणजे २.७३% नत्र असते, सेंद्रिय खतांचा तुटवडा व रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन या झाडांची लागवड डोंगरउतारावर, पडीक जमिनीवर तसेच शेताच्या बांधावर केल्यास पर्यायी हिरवळीचे खत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते.
३) धैंचा : हे तागापेक्षा काटक असे हिरवळीचे पीक असून या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी निर्माण होतात. ज्यामध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.
धैंचा या वनस्पतीच्या मुळावर गाठी निर्माण होण्याची क्षमता इतर द्विदल वनस्पतीपेक्षा ५ ते १०% जास्त असून याचा हिरवळीचे खत म्हणून वापर केला असता १५० ते १८० किलो नत्र प्रति हेक्टरी मिळू शकते. ही वनस्पती दलदलीच्या, पाणी साचून राहणाऱ्या, कोरड्या किंवा क्षारयुक्त जमिनीत पेरणी केली तरी चांगली वाढू शकते.
या पिकाच्या लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे पावसाळ्याच्या सुरुवातीस शेतात पेरावे. बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास सल्फ्युरिक आम्लाची प्रक्रिया करून ते परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझोबियमची जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करून ते पेरावे. पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० सें.मी. उंचीचे वाढीचे असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे.
या काळात धैंचापासून १८ ते २० टन इतकी हिरवी बनस्पती तयार होते. या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण २.५ टक्के इतके असून, मुळावरील व खोडावरील गाठीतील जीवाणूमुळे प्रति हेक्टरी १५० कि.ग्रॅ. नत्र स्थिर केला जातो. हे पीक जमिनीत गाडल्यानंतर एका आठवड्याने भाताची लागण केली असता भात पिकाला हेक्टरी ८० कि. नत्राची उपलब्धता होऊ शकते.
४) बरसीम : या पिकाचा उपयोग प्रामुख्याने गुरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी केला जातो. त्यामुळे हिरवळीचे खत म्हणून याचा वापर कमी आहे, पीक दिसायला मेथी सारखे असून रबी हंगामातील थंडीचा जास्तीत जास्त काळ या पिकाच्या वाढीस पोषक आहे. जमीन नांगरून व कुळवणी करून भुसभुशीत केल्यानंतर रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पेरणी करावी.
पेरणीसाठी हेक्टरी ५० कि. बियाणे वापरून २५ सें.मी. अंतरावर पेरून किंवा फेकून पेरणी करावी. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या देऊन पीक ५० ते ६० दिवसांचे झाले असताना किंवा फुलोऱ्यावर येण्याअगोदर कापून शेतात नांगरून गाडून काढावे. यामध्ये ०.४३% नत्र असून प्रति हेक्टरी ८० ते ८६ किलो नत्र मिळू शकते.
५) लसूणघास : लसूणघास हेही जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरले जाणारे पीक आहे. याची पेरणी बरसीम प्रमाणेच करतात. यासाठी तयार केलेल्या जमिनीवर हेक्टरी २५ किलो बियाणे फेकून किंवा १५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी किंवा फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर कापणी करून नांगराच्या साह्याने जमिनीत काढावे या पिकाच्या हिरवळीच्या खताचे उत्पादन हेक्टरी २० टन होत असून त्यापासून १०० किलो नत्र प्रति हेक्टरी मिळते.
६) द्विदल वर्गीय कडधान्यांची पिके : पावसाळ्याच्या सुरुवातीस शेत तयार करून मूग, चवळी, उडीद कुळीत ,शेतात पेरली असता या द्विदलवर्गीय पिकांचा हिरवळीच्या खतासाठी चांगला उपयोग होतो. मुग ,उडीद कुळीत यासाठी २५ ते ३० किलो तर चवळीसाठी ३५ ते ४० किलो प्रति हेक्टरी बियाणे जमिनीची मशागत करून पेरावे.
पिक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीतून काढल्या असता यापासून प्रतिहेक्टरी ५० ते ६० किलो नत्र पिकास उपलब्ध होऊ शकते. अनेक शेतकरी पिक काढणीनंतर पिकाची अवशेष जमिनीत गाडून त्याचा खत म्हणून उपयोग करतात.
अशाप्रकारे हिरवळीचे खत किती उपयुक्त आहे याचा प्रत्यय येतो त्याचा नियमित वापर करीत राहिल्यामुळे मुख्य उत्पादनात वाढ तर होतेच शिवाय सेंद्रिय खतांची गरज भगविण्यास मदत होऊन जमिनीचा पोत सुधारतो व जमिनीची सुपीकता टिकवता येते.
प्रा. संजय बडेसहाय्यक प्राध्यापक, कृषि विद्या विभाग,दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.
हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण
Web Summary : Green manure enhances soil fertility, reduces fertilizer costs. Use dhaincha, tag, and legumes. It improves water retention, controls weeds, and boosts yields. A cost-effective, eco-friendly farming solution.
Web Summary : हरी खाद मिट्टी की उर्वरता बढ़ाती है, उर्वरक लागत कम करती है। ढैंचा, ताग और फलियां इस्तेमाल करें। यह जल प्रतिधारण में सुधार करता है, खरपतवारों को नियंत्रित करता है और उपज बढ़ाता है। एक किफायती, पर्यावरण अनुकूल कृषि समाधान।