Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा द्राक्षाचे दर दुप्पट मात्र उत्पादन आले निम्म्यावर; हवामानामुळे बागायतदार शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 10:16 IST

Grape Farming : द्राक्ष उत्पादकांना गेल्या सात-आठ वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा आणि आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे. यावर्षी द्राक्षांना बाजारपेठेत विक्रमी दर मिळत असले, तरी अवेळी पडलेल्या पावसामुळे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

विष्णू वाकडे 

जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना गेल्या सात-आठ वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा आणि आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे. यावर्षी द्राक्षांना बाजारपेठेत विक्रमी दर मिळत असले, तरी अवेळी पडलेल्या पावसामुळे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

त्यामुळे दर वाढूनही तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची परिस्थिती 'जैसे थे' असून, शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित नफा पडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील नंदापूर, कडवंची, वरूड, वखारी, धारकल्याण, पीरकल्याण, वाघरूळ या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत.

विशेषतः 'द्राक्षाचे आगार' म्हणून ओळखले जाणारे कडवंची येथील शेतकरी नवनवे प्रयोग करून प्रगतीसाठी धडपडत आहेत. मात्र, कधी कोरोना, कधी दुष्काळ, तर कधी हवामान बदल अशा संकटांनी शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही. तालुक्यात जवळपास ७५० हेक्टरवर द्राक्ष बागा असून, सर्वाधिक क्षेत्र कडवंची-नंदापूर परिसरात आहे.

रोगांचा प्रादुर्भाव, खर्चात वाढ

हवामान बदलाचा द्राक्ष बागांवर मोठा परिणाम झाला. रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना व्यवस्थापनावर मोठा खर्च करावा लागला. कडवंची येथील शेतकरी सदाशिव क्षीरसागर यांनी सांगितले की, औषधोपचाराचा खर्च वाढूनही उत्पादन घटल्याने यावर्षीचा 'गोडवा' कमी झाला आहे.

दराचा 'विक्रम', पण उत्पादनाचा कमी

• शेतकरी सोपान क्षीरसागर यांच्या मते, दीड एकर बागेत ३५० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, केवळ १५० क्विंटलच हाती येत आहे.

• सध्या साध्या द्राक्षाला ७८ रुपये दर मिळत आहे, तर रामदास क्षीरसागर यांना काळ्या द्राक्षासाठी १८१ रुपये आणि पांढऱ्या द्राक्षासाठी ९१ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला आहे.

• गेल्या वर्षी ४५ ते ५० रुपये असलेला दर आता २० ते १०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. व्यापाऱ्यांची मोठी स्पर्धा जालना तालुक्यातील द्राक्ष खरेदीसाठी सध्या मध्य प्रदेश, नाशिक आणि बुलढाणा येथील व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे.

• स्थानिक मार्केटमध्ये १० किलोच्या कॅरेटला २०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. नाशिक आणि सांगली भागात उत्पादन घटल्याचा फायदा जालन्यातील द्राक्षांना मिळत असल्याचे बोलले जात आहे.

• शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असला तरी उत्पादन कमी झाले आहे.

हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Grape prices double, production halves; climate woes hit farmers.

Web Summary : Jalna grape farmers face hardship. Prices are up, but unseasonal rains halved production. Despite high rates, profits remain low due to climate change and disease, impacting grape-growing regions.
टॅग्स :द्राक्षेमराठवाडाबाजारशेतकरीशेतीफळेफलोत्पादनशेती क्षेत्र