lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > द्राक्षबागायतदारांनो सावधान! 'या' कंपनीच्या भेसळयुक्त खतामुळे २०० एकर बागा उध्वस्त!

द्राक्षबागायतदारांनो सावधान! 'या' कंपनीच्या भेसळयुक्त खतामुळे २०० एकर बागा उध्वस्त!

Grape growers beware 200 acres grapes farm destroyed due to Adulterated fertilizers fraud indapur bori farmer | द्राक्षबागायतदारांनो सावधान! 'या' कंपनीच्या भेसळयुक्त खतामुळे २०० एकर बागा उध्वस्त!

द्राक्षबागायतदारांनो सावधान! 'या' कंपनीच्या भेसळयुक्त खतामुळे २०० एकर बागा उध्वस्त!

वालचंदनगर पोलिसांनी संबंधित खत उत्पादक कंपनी आणि विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. 

वालचंदनगर पोलिसांनी संबंधित खत उत्पादक कंपनी आणि विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

इंदापूर:  इंदापूर तालुक्यातील बोरी परिसरात भेसळयुक्त खतांच्या वापरामुळे जवळपास १८० ते २०० एकर द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. छाटणीच्या आधी शेतकऱ्यांकडून बागांना देण्यात येणाऱ्या पोटॅशयुक्त खतामध्ये तणनाशक औषधाची भेसळ असल्यामुळे नुकसान झाले असून वालचंदनगर पोलिसांनी संबंधित खत उत्पादक कंपनी आणि विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, शेतकऱ्यांकडून बागांच्या छाटणीवेळी सल्फेट ऑफ पोटॅश (SOP) हे खत द्राक्षवेलीच्या बुंध्याजवळ सोडले गेले. पण हे खत सोडल्यानंतर काही दिवसांत वेलींनी माना टाकल्या आणि पानेसुद्धा करपली. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी दुकानदाराकडे धाव घेतली असता दुकानदाराने दुकान बंद केल्याचा प्रकार समोर आला. त्याचबरोबर खते निर्मिती करण्याच्या कारखान्यावर शेतकरी गेले असता सदर खतेनिर्मिती प्लँटही बंद आढळला होता.

त्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित खताचे नमुने तपासणी साठी पाठवल्यानंतर यामध्ये तणनाशकयुक्त औषधाची भेसळ आढळून आली, त्यामुळे तालुका कृषी अधिकारी अमर फडतरे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खते निर्मिती करणाऱ्या किसान बायोकेमफर्ट LLP या कंपनीचे मालक रणजित शिंदे यांच्यासहित विक्री करणारे दुकानदार योगेश शिंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

खतामध्ये कशी आहे भेसळ?
किसान बायोकेमफर्ट LLP या कंपनीद्वारे सल्फेट ऑफ पोटॅश (SOP) हे खत उत्पादित करण्यात आले होते. पण नमुन्याच्या तपासणीनंतर या खतामध्ये 2-4-D या तणनाशकयुक्त औषधाचे 5.96 टक्के एवढे प्रमाण  आढळले आहे. 2-4-D हे औषध तणनाशक म्हणून वापरले जाते. ते वेलवर्गीय पिकांसाठी घातक असते. पण तणनाशकाचे अंश थेट द्राक्षाच्या वेलीमध्ये आणि जमिनीमध्ये गेल्यामुळे द्राक्षबागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत.

परिसरातील १८० ते २०० एकर क्षेत्र उध्वस्त
भेसळयुक्त खताच्या वापरामुळे इंदापूर तालुक्यातील बोरी, बिरगुंडी परिसरातील ३० ते ४० शेतकऱ्यांच्या जवळपास १८० ते २०० एकर क्षेत्र उध्वस्त झाले आहे. काही शेतकऱ्यांचे १०० टक्के तर काही शेतकऱ्यांचे ५० टक्क्यापर्यंत क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे वेलीची वाढ पुर्णपणे खुंटली असून पाने करपली आहेत. बागा पूर्वपदावर येण्यासाठी जवळपास तीन वर्षे लागणार आहे. त्यामुळे बागा उपटून टाकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाही. 

भेसळयुक्त खताच्या वापरामुळे द्राक्षांची करपलेली पाने
भेसळयुक्त खताच्या वापरामुळे द्राक्षांची करपलेली पाने

एकरी १५  लाखांचे नुकसान
पिकाची लागवड केल्यापासून द्राक्षाचे पीक घेण्यासाठी तीन वर्षे लागतात. तर फवारणी, खते, औषधे, छाटणी खर्च, मजुरांचा खर्च असा मिळून दरवर्षी सुमारे सहा ते सात लाख रूपये एकरी खर्च येतो. काही शेतकऱ्यांनी सहा ते सात वर्षापूर्वी लागवड केलेल्या बागा बाधित झाल्या आहेत. तर त्यामुळे या शेतीत पुढील तीन वर्षे कोणतेच पीक घेता येणार नाही. त्यामुळे पुढील तीन वर्षांचे उत्पन्न बुडाले आहे. त्याचबरोबर बाग उपटून काढण्यासाठी आणि पुन्हा लागवड करण्यासाठीही खर्च लागणार असून एकरी साधारण १५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची भरपाईची मागणी

ज्या शेतकऱ्यांचे या खताच्या वापरामुळे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी संबंधित नुकसानीच्या भरपाईची मागणी केली आहे. दुकानदारांकडून भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे पण अद्याप कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

नामांकित कंपनीच्या नावाने खत कंपनीकडून दिशाभूल केल्याचा आरोप

दुकानदाराने हे खत ओरिजनल कंपनीचे असल्याचं सांगून विकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ओरिजनल कंपनीचे खत घेण्यासाठी आम्ही चार पाच दिवस थांबलो पण दुकानदारांनी आम्हाला किसान बायोकेमफर्ट LLP या कंपनीचे भेसळयुक्त खत ओरिजनल असल्याचं सांगून दिले आणि आमची फसवणूक केली असा आरोप बोरी येथील शेतकऱ्यांनी केला.

बाधित द्राक्षबागांची पाहणी करताना कृषी अधिकारी
बाधित द्राक्षबागांची पाहणी करताना कृषी अधिकारी


माझी साडेतीन एकर द्राक्षाची बाग आहे. त्यामध्ये अडीच एकर माणिकचमन आणि एक एकर नारायणगाव जम्बो या वाणाची लागवड आहे. बागा छाटणीच्या आधी १५ दिवस SOP हे खत सोडले होते. खत सोडल्यानंतर १८ ते २१ व्या दिवशी बागेच्या अवस्थेवरून खतामध्ये भेसळ असल्याचं  जाणवायला लागलं. त्यानंतर मी काड्याचे नमुने द्राक्षे संशोधन केंद्र मांजरी येथे नेले पण मी सभासद नसल्यामुळे त्यांनी मला रिपोर्ट दिला नाही. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे कृषी विभागाकडून काड्याचे आणि मातीचे परिक्षण करण्यात आले. तर त्यामध्ये 2-4-D चे अंश आढळले आहेत. 
- महादेव सांगळे (नुकसानग्रस्त शेतकरी, बिरंगुडी, ता. इंदापूर)

मी माझ्या तीन एकर क्षेत्रामध्ये चार बॅगा टाकल्या होत्या, माझ्या सर्व क्षेत्राचं १०० टक्के नुकसान झालं आहे. परिसरातील ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या जवळपास १५० एकर क्षेत्रावरील बागा उध्वस्त झाल्या आहेत. यामध्ये काही बागा १०० टक्के तर काही बागांना ५० टक्क्यापर्यंत बाधा झाली. बाधित बागा उपटून टाकल्याशिवाय पर्याय राहिला नाही. खतामध्ये तणनाशकाचे प्रमाण असल्यामुळे या शेतीमध्ये पुढील तीन वर्षे कोणतेही पीक घेता येणार नाही. त्यामुळे एकरी १५ लाख रूपयांचा फटका आम्हाला बसला आहे.
- अमोल खारतोडे (नुकसानग्रस्त शेतकरी, बिरंगुडी पो. कळस, ता. इंदापूर)

मागच्या तीन वर्षापासून ओरिजनल खताच्या नावाखाली भेसळयुक्त खतांची विक्री दुकानदाराकडून केली जात आहे. खतामध्ये भेसळ असल्यामुळे दुकानदाराने त्याच्या स्वत:च्या बागेला हे खत वापरलं नाही. या कंपनीने ओरिजनल 'जय किसान' कंपनीच्या नावाचे दिशाभूल केली असून हीच कंपनी ओरिजनल असल्याचं सांगून खत विक्री केलं. सदर दुकानदाराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पैसे देतो असं सांगितलं आहे पण अजून कुणालाच पैसे दिलेले नाहीत. 
- गणेश शिंदे (नुकसानग्रस्त शेतकरी, बोरी, ता. इंदापूर)

शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे तक्रार केल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन तपासणी केली. आम्हाला दोष आढळल्यानंतर या खताचे नमुने पुण्यातील खते व रसायन प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. तर SOP या खतामध्ये 2-4 D चे अंश आढळले. त्यानंतर तालुका तक्रार निवारण समितीने सदर प्लॉटवर जाऊन भेटी दिल्या, आणि त्यामध्ये 2-4 D च्या अंशामुळे नुकसान झाल्याचे सिद्ध झाले. विभागीय कृषी संचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत सदर कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
- अमर फडतरे (कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरिक्षक, इंदापूर)

Web Title: Grape growers beware 200 acres grapes farm destroyed due to Adulterated fertilizers fraud indapur bori farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.