प्रमोद शेजूळ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात रब्बीचे महत्वाचे पीक असलेल्या हरभरा पिकावर सध्या मर, करपा, भुरी, घाटेअळी अशा विविध रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. बदलत्या हवामानावा हा फटका असून खरीपापाठोपाठ रब्बी पिकेही हातची जातात की, काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत असून ते अडचणीत सापडले आहेत.
सिल्लोड तालुक्यातील खरीप पिकांना यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांची शेती पिकांसह खरडून गेली. या दुःखातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केलेली आहे. किमान यातून तरी थोडे नुकसान भरुन निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. खरीप पिकांमध्ये यंदा तालुक्यात २५ हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आलेली आहे.
यात चांगला दर मिळणाऱ्या डॉलर हरभऱ्याचे प्रमाण मोठे आहे. सध्या हे पिक फुलोऱ्यासह घाट्यात असताना कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण, तर कधी अचानक वाढलेली आर्द्रता अशा बदलत्या हवामानाचा या पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणावर मर, करपा, भुरी तसेच घाटे पोखरणाऱ्या घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. तर काही भागांत हरभरा पिवळा पडून वाळत असल्याने शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत.
फुलोरा व घाटे धरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेतच या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. भराडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रोग नियंत्रणासाठी हजारो रुपये खर्च करून औषध फवारणी केली, मात्र सतत बदलणाऱ्या हवामानामुळे अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार आहे.
सिल्लोड तालुक्यात हरभरा पिकाची २५ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. मर रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी. तसेच कृषी कर्मचाऱ्यांना संबंधित प्रादुर्भाव क्षेत्रावर पाठवून मार्गदर्शन केले जाईल. - डॉ. संदीप जगताप, तालुका कृषी अधिकारी.
नुकसान आणखी वाढू शकते! शेतकऱ्यांनी व्यक्त केली भीती
खत, बियाणे व मजुरीचा खर्च आधीच वाढलेला असताना औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढवत आहे. कृषी विभागाकडून वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन व योग्य औषधांची माहिती न मिळाल्यास नुकसान आणखी वाढू शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Web Summary : Erratic weather patterns in Sillod, Chhatrapati Sambhajinagar, are causing widespread disease in chickpea crops. Farmers fear significant yield reductions due to blight, root rot, and pod borers despite pesticide applications. Agricultural officials advise fungicide spraying and promise guidance.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर के सिल्लोड में मौसम के बदलाव से चने की फसल में रोग फैल रहे हैं। किसानों को उपज में कमी का डर है। कृषि अधिकारियों ने कवकनाशी छिड़काव की सलाह दी है।