Join us

राज्याच्या 'या' कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 'सेस' वसुलीत चक्क गुंडांचा हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:31 IST

Mumbai APMC Market : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सेस चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. गुंडांचा हस्तक्षेपही वाढला असून, कर न भरता वाहने सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकारही घडू लागले आहेत.

नामदेव मोरे

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सेस चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. गुंडांचा हस्तक्षेपही वाढला असून, कर न भरता वाहने सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकारही घडू लागले आहेत. मार्केटमध्ये दहशतीचे वातावरण झाले असून, ही गुंडगिरी कोण मोडून काढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फळमार्केटमध्ये २३ वर्षापासून थेट गेटवर बाजार फी वसूल करण्यात येत आहे. वाहतूकदार व खरेदीदार पूर्ण कर भरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीच्या अहवालामध्येही महसुलाचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अनेक नवीन प्रकार निदर्शनास येत आहेत.

शिवीगाळ, मारहाण

वाहनांमधील सर्व फळांचा कर भरला जात नाही. हे बाजार समितीच्या कारवाईतूनही स्पष्ट झाले आहे. वाहने कर न भरता सोडण्यासाठी गेटवरील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जातो. त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली जाते.

कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये. कोणी धमकी देत असेल, गुंडगिरी करत असल्यास निदर्शनास आणून दिल्यास त्यांच्यावर कारवाई करता येईल. - संजय पानसरे, संचालक फळ मार्केट

भीतीमुळे तक्रार नाही

फळ मार्केटच्या गेटवर काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी वाहने अडविल्यामुळे त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीही केली. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. दहशत व गुंडगिरीमुळे कर्मचारीही दबावामध्ये असून, भीतीमुळे कोणी तक्रार करत नाही.

काय आहे व्हिडीओत...

• गेटवरील काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ बाजार समितीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वाईट भाषेत शिवीगाळ करत आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आवाज येत आहे.

• एपीएमसीचा कर्मचारी फोन करून साहेब सुरज्या आई-बहिणीवरून शिव्या देत असल्याची माहिती कोणाला तरी देत असल्याचे पाहावयास मिळते.

हेही वाचा : ड्रोन होईल शेतकऱ्यांचा सालगाडी; वाचा भविष्यात कशी असेल ड्रोन तंत्रज्ञानाची आधुनिक प्रगत शेती

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डशेतकरीभाज्यापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमुंबई