राजाराम लोंढे
कोल्हापूर : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला चांगली मागणी असून आगामी दसरा, दिवाळी सण पाहता अजून तेजी राहू शकते.
केंद्र सरकारने सप्टेंबरचा साखर विक्री कोटा २३.५ लाख टन दिला असला तरी बाजारातील साखरेची मागणी आणि शिल्लक साखर पाहता आगामी काळात दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या कारखान्यांकडून प्रतिक्विंटल ३,९०० रुपयांनी साखरेची विक्री सुरू असल्याने कारखान्यांनी गडबड न करता बाजारपेठेचा अंदाज बघून साखर विक्रीसाठी खुली करावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.
बाजारात समतोल राहावा, यासाठी केंद्र सरकार देशातील कारखान्यांना साखर विक्रीचा कोटा ठरवून देते. सध्या बाजारातील मागणी, देशात सध्या सप्टेंबरच्या कोट्यासह ६५ लाख टन शिल्लक साखरेचा कोटा आणि दसरा-दिवाळीचा सण पाहता साखरेला आणखी तेजी येणार आहे.
साखरेचा किमान हमीभाव ४ हजार शक्य
देशभरातील साखर कारखान्यांनी साखरेचा किमान हमीभावात वाढ करावी, म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्यक्ष उत्पादन खर्च मागवला आहे. येत्या १५ दिवसांत खासदारांचे शिष्टमंडळ शाह यांची भेट घेऊन किमान ४ हजार रुपये भाव करण्याची मागणी करणार आहेत.
इथेनॉल दरवाढीची मागणी
देशातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी ४० हजार कोटीची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे इथेनॉल आयातीला साखर उद्योगाने विरोध केला आहे. आगामी हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न करताना केंद्राने त्याच्या दरात वाढ करण्याची मागणी होत आहे.
राज्यनिहाय सप्टेंबरचा साखरकोटा (टनमध्ये)
उत्तरप्रदेश - ९,५०,३९३
महाराष्ट्र - ७,१०,५३७
कर्नाटक - २,८१,६४६
गुजरात - ८९,७२०
बिहार - ५७,८०१
तामिळनाडू - ५२,३१६
हरियाणा - ५१,१८७
मध्यप्रदेश - ४९,३०९
उत्तराखंड - ४४,०७४
पंजाब - ४२,५९८
आंध्रप्रदेश - ९,४७३
तेलंगणा - ३,७९७
ओडिशा - ३,२६२
राजस्थान - २,१०२
छत्तीसगड - १,१८५
देशातील शिल्लक साखर आणि आगामी काळातील मागणी पाहता साखरेला चांगला भाव मिळू शकतो. त्यामुळे कारखान्यांनी साखर विक्रीसाठी गडबड करू नये. साखरेच्या किमान भावात वाढ करण्यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न सुरू असून साधारणता हंगामापूर्वी हा निर्णय अपेक्षित आहे. - पी. जी. मेढे, साखर उद्योगातील अभ्यासक
अधिक वाचा: शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर