गजानन मोहोड
अमरावती : अचलपूर व अंजनगाव सुर्जीमधील काही भागात औषधी वनस्पती असलेल्या पानपिंपळीचे उत्पादन घेतले जाते. शिवाय खारपाणपट्टा असलेल्या भागातील हरभरा हा विशिष्ट खारपट चव व टिकवण क्षमतेसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे.
या दोन्ही उत्पादनाला भारत सरकारचे भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पिकास जगभर ओळख मिळाली आहे.
भौतिक क्षेत्राची ओळख असलेली उत्पादने किंवा ओळख देण्यासाठी भौगोलिक मानांकन दिले जाते. भारतामध्ये जीआय मानांकन भारत सरकारच्या कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाइन ॲन्ड ट्रेडमार्कच्या अंतर्गत येणाऱ्या जिओग्रॉफिकल इंडिकेशन रजिस्ट्रीमार्फत दिले जाते.
चेन्नई येथे या कार्यालयाचे मुख्यालय आहे. यासाठी जिल्ह्यातील कार्ड या संस्थेमार्फत प्रयत्न करण्यात आले होते. याबाबतची माहिती जीआय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली व त्यावर कुणाचाही आक्षेप नसल्याने आता जीआय मानांकन देण्यात आले.
यांनी केले प्रयत्न
वैशिष्ट्ये जपणाऱ्या पिंपरी व हरभऱ्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ३३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी नावीन्यपूर्ण बाब अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. यासाठी कार्ड संस्थेला एसएओ सातपुते यांच्यासह पीकेव्ही अकोला, केव्हीके दुर्गापूर व घातखेडा येथील शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन प्राप्त झाले.
ही आहेत वैशिष्ट्ये
• हरभरा : खारपाणपट्ट्यातील जिरायती हरभरा हा बारीक असतो. यामध्ये खारट चव व टिकाऊपणा जास्त आहे.
• पिंपळी : ही एक औषधी वनस्पती आहे व अमरावती जिल्ह्याच्या काही भागातच उत्पन्न घेतले जाते.
विस्तारित बाजारपेठ उपलब्ध होणार
पिंपळी व हरभऱ्याला जीआय मानांकन मिळाल्याने या दोन्ही उत्पादकांना विस्तारित बाजारपेठ उपलब्ध होईल व मागणी वाढून उत्पादनांना चांगला भाव मिळेल व हा एक बँड तयार होईल. शिवाय या दोन्ही उत्पादनांना भौतिक ओळख मिळाली आहे. यामुळे स्थानिक व इतरत्र देखील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.