Join us

FRP Sugarcane : राज्यातील १०८ साखर कारखान्यांपैकी या दोन साखर कारखान्यांनी दोन कोटी एफआरपी थकवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 09:56 IST

मागील वर्षी राज्यात गाळप हंगाम घेतलेल्या १०८ साखर कारखान्यांपैकी केवळ दोन साखर कारखान्यांनी दोन कोटी ५ लाख इतकी एफआरपी थकवली असून, हे दोन्ही कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

सोलापूर : मागील वर्षी राज्यात गाळप हंगाम घेतलेल्या १०८ साखर कारखान्यांपैकी केवळ दोन साखर कारखान्यांनी दोन कोटी ५ लाख इतकी एफआरपी थकवली असून, हे दोन्ही कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

मागील हंगामात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३६ हजार ७५६ कोटी रुपये मिळाले आहेत. यावर्षीच्या साखर हंगामाने आता चांगला वेग घेतला आहे.

राज्यात यंदा ऊस क्षेत्र कमी असल्याने, उशिरापर्यंत पाऊस पडल्याने शिवाय विधानसभा निवडणुकीमुळे १५ नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू करण्यास साखर आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

राज्यातील काही साखर कारखाने २० नोव्हेंबर अगोदर सुरू झाले, मात्र बहुतेक साखर कारखाने मतदानानंतर (२० नोव्हेंबर) सुरू झाले आहेत.

आता साखर हंगाम वेग घेत असताना मागील वर्षी गाळप घेतलेल्या १०८ साखर कारखान्यांपैकी १०६ कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्यातील १०६ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची एफआरपी चुकती केली असताना दोन साखर कारखाने मात्र थकबाकीच्या यादीत आहेत. हे दोन्हीही साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

आदिनाथ व मातोश्रीमागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३६ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यापैकी मातोश्री लक्ष्मी शुगरकडे १ कोटी ४१ लाख, तर आदिनाथ सहकारीकडे ६४ लाख अशी एफआरपीचे २ कोटी ५ लाख रुपये थकले आहेत. मागील गाळप हंगामात राज्यातील ११ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातीलच तब्बल ८ साखर कारखाने आहेत.

टॅग्स :साखर कारखानेऊससोलापूरशेतकरीनिवडणूक 2024सरकारराज्य सरकार