केंद्र शासनाने बियाणांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संनियंत्रणासाठी SATHI (Seed Authentication Traceability and Holistic Inventory) पोर्टल विकसीत केले आहे.
साथी पोर्टलची अंमलबजावणी फेज १ व फेज २ अशा दोन टप्प्यात करण्यात येत आहे. फेज १ - पैदासकार, पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन. फेज २ उत्पादित बियाण्याचे वितरण/विक्री.
खरीप २०२३ पासून महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत फेज-१ टप्प्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
यामध्ये बियाणे उत्पादक कंपन्यांच्या पैदासकार, पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन कार्यक्रमाची सर्व प्रक्रिया (उत्पादक कंपन्यांचे शेतनोंदणीपासून उत्पादित बियाण्यास मुक्त साठा प्रमाणपत्र देणेपर्यंतची) साथी पोर्टलमार्फतच केली जाते.
कृषी विभागाच्या संनियंत्रणाने खरीप हंगाम २०२४ पासून फेज-२ टप्प्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली असून यामध्ये उत्पादित झालेल्या प्रमाणित बियाण्याचे वितरण/विक्री साथी पोर्टलवर सुरू करण्यात आलेले आहे.
सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवर घेण्याचे उद्देश१) सत्यप्रत बियाणे मुख्यता खासगी बियाणे उत्पादक संस्थामार्फत उत्पादित केलेले संशोधित वाणाचे बियाणे असते. २) शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या बियाणांमध्ये ७०-८०% सहभाग सत्यप्रत बियाणाचा आहे. ३) बियाणे वितरण प्रणालीमध्ये शोधण्यायोग्यता (Traceability) वाढण्यास मदत होईल. ४) बियाणांच्या संपूर्ण प्रवासावर (वितरण, विक्री इ.) नियंत्रण ठेवता येते, त्यामुळे पारदर्शकता वाढेल. ५) बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस प्रतिबंध घालून बियाणे व्यवसायातील अपप्रवृत्ती आणि गैरव्यवहारांना आळा घालता येईल. ६) बियाणे उत्पादन कंपन्या, वितरक आणि विक्रेते यांच्यातील समन्वय वाढून त्यांचे व्यवस्थापन सोपे होईल.७) परराज्यात उत्पादित परंतु महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या बियाणांवर नियंत्रण ठेवता येईल. ८) यामुळे शेतकऱ्यांना योग्य व खात्रीशीर प्रतीचे बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल.
महाराष्ट्रासाठी साथी पोर्टलवर सत्यतादर्शक बियाणे वितरण/विक्री होण्यासाठी केंद्र शासनाशी समन्वय ठेवून विशिष्ठ कार्यप्रणाली विकसीत करुन येत्या खरीप २०२५ हंगामापासून राज्यामध्ये सत्यप्रत बियाणांची विक्री/वितरण साथी पोर्टलव्दारे करण्यास शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे.