Join us

Orange Crop Insurance : निकषात बसत असूनही संत्रा उत्पादकांना विमा मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 1:38 PM

शेतकऱ्यांना सहा महिन्यांपासून विम्याची प्रतीक्षा!

विवेक चांदूरकर

गतवर्षी पावसाळ्यात १५ जून ते १५ जुलैदरम्यान १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे संत्रा फळधारणेवर परिणाम झाला. संत्रा उत्पदाकांनी काढलेल्या विम्यातील निकषानुसार कमी पाऊस झाल्यास नुकसान भरपाई मिळते. मात्र, शेतकयांचे नुकसान होऊनही निकषानुसार अद्याप विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

सिंचनाची सोय असल्याने बुलढाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी संत्रा फळबागा फुलविल्या आहेत. विशेषतः सोनाळा परिसरात संत्र्याच्या अनेक बागा आहेत. देशभरातून येथे व्यापारी संत्रा खरेदीकरिता येतात, जिल्ह्यात गतवर्षी पावसाळ्यात १५ जून ते १५ जुलैदरम्यान अल्प प्रमाणात पाऊस पडला.

विमा कंपनीच्या निकषानुसार या एका महिन्यात १२५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला, तर ४० हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्याचा निकष आहे, तसेच १२५ मिमीपेक्षा जास्त व १५० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला तर १२ हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्याचा निकष आहे.

या निकषानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळायला हवे. शेतकऱ्यांना नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित असते. मात्र, यावर्षी मे संपत आला तरी अद्याप शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली !

संत्रा उत्पादक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे विमा देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी संत्रा उत्पादक कंपनीला पत्र लिहून विमा देण्याचे सांगितले. तसेच, कोणत्या महसूल मंडळात किती पाऊस झाला, याची आकडेवारीही पाठविली. मात्र, त्यानंतरही गत पाच शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही.

संत्रा उत्पादक समिती न्यायालयात जाणार

निकषानुसार पीक विमा मिळायला हवा. १५ जून ते १५ जुलैदरम्यान सोनाळा भागात १०१ मिमी पाऊस झाला. मात्र, तरीही विमा कंपनीच्या वतीने पैसे देण्यात आले नाही. अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांपुढे गाऱ्हाणे मांडूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे न्यायालयात जाणार असल्याचा इशारा संत्रा उत्पादक समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

२२ मंडळातील शेतकरी १२ हजार रूपये विम्यासाठी पात्र !

जिल्ह्यातील कोलारा, शेलगाव, पाडळी, देऊळघाट, अंढेरा, मेहकर, हिवरा, मलकापूर, सोनोशी, बीबी, सुलतानपूर, काळेगाव, माटरगाव, जलंब, धामणगाव पिपंळगाव यासह २२ मंडळामध्ये १२४ ते १५० मिमी पाऊस झाला. त्यामुळे या मंडळातील शेतकरी १२ हजार रूपयांच्या विम्यासाठी पात्र आहेत.

या भागात झाला १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस!

जिल्ह्यातील जळगाव, जामोद, वडशिंगी, आसलगाव, सोनाळा, बावनबीर, पातुर्डा, कवळळ, देऊळगाव राजा तालुक्यातील देउळगाव शहर, ग्रामीण भाग, मेहूणा, अंजनी, पारखेड, बोराखेडी, रोहीण खेड, नांदुरा, वडनेर, शेंबा, निमगाव या मंडळांमध्ये १२४ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. १५ जून ते १५ जुलैदरम्यान कमी पाऊस झाल्याने फळधारणेवर परिणाम झाला. आम्ही पैसे भरून विमा काढला आहे. निकषानुसार विमा द्यायला हवा. मात्र, कंपनी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयात जाणार आहे. - तुकाराम इंगळे उपाध्यक्ष, संत्रा उत्पादक समिती, सोनाळा.

हेही वाचा - Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग

टॅग्स :शेतीशेतकरीपीक विमाविदर्भनागपूरफळेपीक