जवळा : अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यंदा १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू करण्याची घोषणा केली खरी, मात्र अद्याप जिल्ह्यात एकही खरेदी केंद्र कार्यान्वित झालेले नाही.
परिणामी, शेतकऱ्यांना पहिल्याच वेचणीतील कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता आली नाही.
सततच्या पावसाने कपाशीचे नुकसान झाले असून, कापसाचा हंगाम लांबणीवर गेला. लक्ष्मीपूजनासाठीही नवीन कापूस दिसला नाही.
कीड व रोगांमुळे कपाशीच्या बोंडांची गळती झाली. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यातच शासनाने आयात शुल्क कमी केल्याने कापसाच्या दरास मोठा फटका बसला आहे.
गावांतील रस्त्यावर वजनकाटे दिसेना
गतवर्षी कापूस खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली, तेव्हा चौकाचौकांत खरेदीसाठी वजन काटे असायचे, पण सध्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्याने रस्त्यावर किंवा चौकात कुठेच खरेदीसाठी वजनकाटे दिसत नसल्याने शेतकऱ्यांनाही अडचणीचे झाले आहे.
पावसात कापूस भिजला, दरात घसरण
काही भागांत पावसाने पहिल्या वेचणीचा कापूस भिजला. त्यामुळे प्रतवारी खराब होऊन दरात घसरण झालेली आहे. त्यामुळे अशा प्रतवारीच्या कापसाला फारच कमी भाव मिळत आहे.
७,७१० रुपये हमीभाव
चालू हंगामा (२०२५-२६) साठी कापसासाठी केंद्र सरकारने ७,७१० रुपये प्रतिक्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या बाजारात यापेक्षा कमी दर मिळत आहे.
उत्पादनखर्चही निघेना
कपाशी उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. बियाणे, खते, कीटकनाशके मशागत, रासायनिक खते व मजुरीचा खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढला. त्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
उत्पादकांच्या पदरी निराशा
◼️ सोयाबीन पावसाने खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, सोयाबीन हे बोनस पीक असल्याने दिवाळीचे बोनसच निसर्गाने हिरावून घेतले. त्यामुळे कपाशीवर बहुतांश शेतकऱ्यांची भिस्त आहे.
◼️ मात्र, सततचा पाऊस, अतिवृष्टी व कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न आहे.
अधिक वाचा: राज्यात ऊस गाळपाची मोठी घाई; कारखान्यांनी पहिल्या उचलीचा आकडा जाहीर केल्यावरच उसाला कोयता
