Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमधील समस्यांचे उपाय शोधा अन् २५ लाखांचे बक्षीस जिंका; काय आहे स्पर्धा? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:17 IST

agri hackathon pune 2026 कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन आणि तांत्रिक परिवर्तनाला गती देण्यासाठी गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या अ‍ग्री हॅकेथॉन स्पर्धा यंदाही आयोजित करण्यात येणार आहे.

पुणे : कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन आणि तांत्रिक परिवर्तनाला गती देण्यासाठी गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या अ‍ग्री हॅकेथॉन स्पर्धेला मिळालेल्या यशानंतर आता दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅग्री हॅकेथॉनचे १५ ते १७ मे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग आणि प्रमुख कृषी संस्था यांच्या वतीने पुण्यातील कृषी महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे.

यामध्ये अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. या स्पर्धेत विजेत्याला २५ लाख आणि उपविजेत्याला १५ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.

कृषीतील संशोधन आणि तांत्रिक परिवर्तनाला गती देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणे, उत्पादकता वाढविणे आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

स्पर्धकांनी सहभागी होण्याकरिता मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन, शेती यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया आणि मूल्यसाखळी, अक्षय ऊर्जा आणि कृषी कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि कीड व्यवस्थापन विषयांवर उपाय सादर करता येणार आहे.

तसेच हवामान-अनुकूल आणि डिजिटल शेती,  प्रभावी कृषी प्रशासनासाठी एआय, तंत्रज्ञान आधारित हस्तक्षेप, प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि भाकितासाठी एआय, तंत्रज्ञान, साधने प्रमुख विषयांवर आपले उपाय सादर करता येणार आहे.

उद्योजक, सरकार आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन शेतीच्या भविष्यासाठी स्वस्त आणि नावीन्यपूर्ण उपाय तयार करावेत, यावर या हॅकेथॉनचा भर असणार आहे.

या स्पर्धेत विजेत्याला २५ लाख रुपये आणि उपविजेत्याला १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय निवडक प्रकल्पांना 'इन्क्युबेशन' (मार्गदर्शन) आणि निधी मिळवून देण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अ‍ॅग्री हॅकेथॉन हे कृषी नवोन्मेषाचे सर्वात मोठे व्यासपीठ म्हणून उदयास येत असून, यामुळे पुणे शहर कृषी तंत्रज्ञान आणि उद्योजकतेचे केंद्र होण्यास मदत होणार आहे.

अधिक माहिती व नोंदणीसाठी https://www.puneagrihackathon .com/ संकेतस्थळाला भेट द्यावे, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Solve farm problems, win 2.5 million prize: Agri Hackathon

Web Summary : Pune is hosting an Agri Hackathon in May, offering ₹25 lakhs for innovative solutions to agricultural challenges. Focus areas include soil management, water conservation, mechanization, and climate-smart farming. Registration is open at puneagrihackathon.com.
टॅग्स :शेतीविज्ञानतंत्रज्ञानआर्टिफिशिअल इंटेलिजन्सपुणेडिजिटलपाणीमहाविद्यालयजिल्हाधिकारीसरकारहवामान अंदाज