Pune : यंदाच्या म्हणजेच २०२५ च्या खरीप हंगामासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून तयारी सुरू झाली असून या हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा कोटा केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. सर्व खते मिळून ४६ लाख ८२ हजार मेट्रीक टनाचे म्हणजे जवळपास ४७ लाख मेट्रीक टनाचे आवंटन मंजूर झाले असून या खरिपात सेंद्रीय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, खरीप हंगाम २०२५ साठी राज्याला युरिया १५.५२ लाख मेट्रिक टन, डीएपी ४.६ लाख, एमओपी १.२० लाख मेट्रिक टन, संयुक्त खते १८ लाख मेट्रिक टन आणि एसएसपी ७.५० लाख मेट्रिक टन असे एकूण ४६ लाख ८२ हजार मेट्रिक टन एवढे आवंटन मंजूर झालेले आहे.
यासोबतच केंद्र सरकारने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रीय खताचा वापर करावा आणि सेंद्रीय शेतीकडे वळावे यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. राज्यामध्ये ही योजना डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या नावाने सुरू असून परंपरागत कृषी विकास योजना ही केंद्राची सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणारी योजना आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करावा यासाठी आहे.
रासायनिक खतांचा वापर हा शिफारशीनुसारच करावा. त्यासाठी माती तसेच पाणी परीक्षण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी पर्याय खते खते जसे की सेंद्रिय खते, नॅनो खते व जैविक खते यांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन कृषी संचालक सुनील बोरकर यांनी केले आहे.