Join us

शेतकरी ताई कामाच्या ओघात स्वतःकडे दुर्लक्ष करू नको; 'या' कर्करोगाचे महिलांमध्ये प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:30 IST

Women Farmer Health : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि काही सवयींमुळे महिलांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer).

रविंद्र जाधव 

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि काही सवयींमुळे महिलांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. ग्रामीण भागात, विशेषतः शेतीत राबणाऱ्या महिलांनी याबद्दल जागरूक राहणे खूप गरजेचे आहे.

कारण अनेकदा शेतकरी कुटुंबातील महिला तसेच शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर महिला या आपल्या आरोग्यकडे पुरेसे लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे.  

गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे काय?

गर्भाशयाच्या (uterus) तळाला एक छोटा भाग असतो, ज्याला "गर्भाशयाचा मुख" (cervix) असे म्हणतात. याठिकाणी काही बदल झाले, तर त्यातून कर्करोग तयार होऊ शकतो.

कोणती लक्षणं दिसतात? 

• अंगावरून पांढरे किंवा लालसर पाणी जाणे.

• ओटीपोटात वारंवार किंवा सतत दुखणे.

• शरीरास सूज जाणवणे.

• शारीरिक संबंधानंतर रक्तस्राव होणे किंवा त्रास होणे.

• मासिक पाळी नियमित नसणे किंवा खूप रक्तस्राव होणे.

कारणं कोणती असू शकतात?

• अल्प वयात लग्न होणे व गरोदर राहणे. 

• वारंवार गर्भधारणा किंवा गर्भपात. 

• योनी मार्गाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष.

• धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन.

• HPV (Human Papilloma Virus) या विषाणूची लागण.

• अपुरी प्रतिकारशक्ती

कशी तपासणी केली जाते?

• प्री-पेंप क्यूआर स्ट्रिप - ही एक सोपी चाचणी असून, महिलांना कुठलेही दुखणं न होता, या स्ट्रिपच्या सहाय्याने गर्भाशय मुखाचा प्राथमिक तपास केला जातो.

• पॅप स्मिअर टेस्ट - यामध्ये गर्भाशयाच्या मुखातील पेशी तपासल्या जातात.

• बायप्सी - संशयित पेशींचा नमुना घेऊन अधिक तपासणी केली जाते.

उपचार काय असतात?

जर कर्करोगाची पुष्टी झाली, तर त्याच्या टप्प्यानुसार उपचार केले जातात.

• औषधोपचार

• किरणोपचार (Radiation therapy)

• शस्त्रक्रिया (Surgery)

• केमोथेरपी

आपण काय करू शकतो?

• नियमित तपासणी करून घ्या.

• जननेंद्रियांची स्वच्छता राखा. 

• धूम्रपान, तंबाखू यापासून दूर रहा.

• HPV लस (लसीकरण) करून घ्या (विशेषतः तरुणींनी).

कोणतीही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांकडे त्वरित जा

ज्या महिलांमध्ये प्री-पेंप स्ट्रिपमध्ये कर्करोगाचा संशय आला आहे त्यांची पुढील तपासणीसाठी त्वरित आपल्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा खाजगी आरोग्य सल्लागारांशी चर्चा करणे फायद्याचे आहे. 

हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी

टॅग्स :स्त्रियांचे आरोग्यशेतकरीशेतीअन्नआरोग्यहेल्थ टिप्स