केंद्र पुरस्कृत योजना-औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन या योजनेंतर्गत सन २०१५-१६ पासून राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रम महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळामार्फत राबविण्यात येत होता.
सदर योजनेअंतर्गत सन २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीमध्ये ८१८.२३ हेक्टर क्षेत्रावर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आलेली असून त्याकरिता रक्कम रु. ४१५.१२ लक्ष एवढे अनुदान अदा करण्यात आलेले आहे.
तथापि सन २०२०-२१ पासून औषधी वनस्पती घटक हा राष्ट्रीय आयुष अभियानाचा घटक नसल्याचे तसेच सन २०२१-२२ पासून औषधी वनस्पती लागवड योजना बंद करण्यात आले असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. सदरील घटक आयुष मंत्रालयाकडून कृषि मंत्रालयाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.
तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपिक लागवड कार्यक्रम शासन निर्णय जरी केला होता.
त्या शासन निर्णयान्वये अर्जुन, असान, अशोका, बेहडा, हिरडा, बेल, टेटू, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आइन, शिवन, गुग्गुळ, बिब्बा व करंज या १६ वृक्ष वर्गीय औषधी वनस्पतींना अनुदान अनुज्ञेय आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. ३१/१२/२०२५ रोजी प्राप्त झाल्या असून सदरील मार्गदर्शक सूचनांमध्ये औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे.
औषधी व सुगंधी वनस्पती लागवड या घटकाकरिता केंद्र शासनाने सन २०२५ -२६ मध्ये रक्कम रु. ४४०.०० लक्ष एवढ्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजूरी दिलेली आहे.
औषधी व सुगंधी वनस्पतींचे पिक निहाय आर्थिक मापदंड खालीलप्रमाणे
अ.क्र | वनस्पतीचे नाव | मापदंड (प्रती हेक्टर) | देय अर्थसहाय्य (प्रति हेक्टर) |
१ | औषधी वनस्पतीजेष्ठमध/मुलेठी, शतावरी, कालीहारी/कळलावी, सफेद मुसळी, गुग्गुळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा, पुष्करमूळ | रु. १.५० लाख | सर्वसाधारण क्षेत्रामध्ये @४०% आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये ५०% अर्थसहाय्य.लागवड साहित्य व (INM/IPM) चा खर्च २ हप्त्यामध्ये (२ हेक्टर च्या मर्यादेत) |
२ | महाग सुगंधी वनस्पतीगुलाब, रोझमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाइल, चंदन, दवणा, जाई, लॅव्हेंडर | रु. १.२५ लाख | सर्वसाधारण क्षेत्रामध्ये @४०% आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये ५०% अर्थसहाय्य.लागवड साहित्य व (INM/IPM) चा खर्च २ हप्त्यामध्ये (२ हेक्टर च्या मर्यादेत) |
३ | इतर सुगंधी वनस्पतीपामरोसा, गवती चहा, तुळस, व्हेटिव्हर, जावा, सिट्रोनेला, गोड तुळशीपत्र | रु. ०.५० लाख | सर्वसाधारण क्षेत्रामध्ये @४०% आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये ५०% अर्थसहाय्य.लागवड साहित्य व (INM/IPM) चा खर्च २ हप्त्यामध्ये (२ हेक्टर च्या मर्यादेत) |
तरी, सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करू इच्छिणाऱ्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.अधिक माहितीसाठी जवळील कृषी सहाय्यक/मंडल कृषी अधिकारी,/तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक वाचा: Jaltara : मनरेगातुन जलतारा खड्डा कसा आणि कुठे काढावा? किती मिळतंय अनुदान? वाचा सविस्तर