Join us

जिल्हा परिषदेच्या सेसमधून शेतकऱ्यांना मिळणार कडबाकुट्टी, फवारणी ड्रोन; कसा कराल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:34 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सन २०२५-२६ या वर्षातील सेस निधीतून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, ड्रोन फवारणी यंत्र व स्लरी फिल्टर उपकरण, असा सुमारे ८७ लाखांचा लाभ देण्यात येणार आहे.

अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सन २०२५-२६ या वर्षातील सेस निधीतून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, ड्रोन फवारणी यंत्र व स्लरी फिल्टर उपकरण, असा सुमारे ८७ लाखांचा लाभ देण्यात येणार आहे.

यासाठी कृषी विभाग २६ व २८ ऑगस्ट रोजी पंचायत समितीस्तरावर लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड करणार आहे. शेतीसाठीचा खर्च कमी व्हावा तसेच अधिकाधिक उत्पादन मिळावे, या हेतूने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे विविध योजना, उपक्रम राबविले जातात.

दरम्यान, सन २०२५-२६ या वर्षात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अंदाजपत्रकात सेसमधून शेतकऱ्यांना शेतीसाठीची उपकरणे, वस्तू घेण्यासाठी काही निधीची तरतूद केली आहे.

त्यानुसार कडबाकुट्टी, ड्रोन फवारणी यंत्र, तसेच स्लरी फिल्टर उपकरण या तीन वस्तूंसाठी थेट शेतकऱ्याच्या खात्यात निधी वर्ग केला जाणार आहे. यात आलेल्या अर्जामधून लाभार्थी शेतकऱ्यांची लॉटरीद्वारे निवड केली जाईल.

नंतर निवडलेल्या शेतकऱ्याने संबंधित वस्तू विकत घेऊन त्याची बिले कृषी विभागाला सादर करायची, त्याची पडताळणी करून कृषी विभाग ठरलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करेल.

२६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, अहिल्यानगर, तर २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव, अकोले, राहाता, राहुरी, संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर येथील पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पात्र लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड केली जाईल.

नंतर २९ ऑगस्ट रोजी निवड केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी पूर्वसंमती पत्र देण्यात येईल.

असा मिळेल लाभप्रत्येक तालुक्याला चार (जामखेड ३) याप्रमाणे कडबाकुट्टीसाठी ५ लाखांची तरतूद केली आहे. यात प्रतिशेतकऱ्याला १ हजारांच्या मयदित लाभ दिला जाईल. स्लरी फिल्टर उपकरणासाठी (५० टक्के रक्कम किंवा २० हजार मयदिपर्यंत) १२.५० लाखांची तरतूद आहे. याशिवाय शेतकरी उत्पादक कंपनीसाठी प्रत्येक तालुक्यात एक ड्रोन फवारणी यंत्र पुरविले जाणार आहे. यासाठी ५ लाखांप्रमाणे १४ तालुक्यांसाठी ७० लाखांचा लाभ दिला जाणार आहे.

अशी असेल प्रक्रियानिवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्याने प्रथम ही वस्तू बाजारातून विकत घेऊन त्याचे बिल कृषी विभागाकडे सादर करायचे आहे. त्यानंतर कृषी विभाग संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर डीबीटीद्वारे लाभाची रक्कम वर्ग करेल.

अर्ज करण्याची मुदतसंबंधित लाभासाठी एप्रिलपासूनच अर्ज स्वीकारले जात आहेत; परंतु अजूनही शेतकऱ्यांना यात सहभागी होता येईल. संबंधित पंचायत समितीत १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. १८ ते २२ ऑगस्टपर्यंत प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृत केले जातील.

ग्रामीण भागातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या योजनांचा लाभघेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत. लॉटरीतून लाभार्थ्यांची निवड केली जाईल. - सुधीर शिंदे, कृषी विकास अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद

अधिक वाचा: लग्नाच्या वाढदिवसाची अनोखी भेट; शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर लावले पत्नीचे नाव

टॅग्स :शेतीशेतकरीकृषी योजनासरकारअहिल्यानगरबँकजिल्हा परिषद