शेतकरी हा एकूणच समाजाचा कणा आहे. तो रात्रंदिवस मेहनत करून अन्नधान्य पिकवतो. मात्र अन्नदाता असणाऱ्यांना शेतकाऱ्यांनी आपल्या शरीराची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
विशेषतः हृदय, आपलं आयुष्य चालवणारं इंजिन याचं आरोग्य जपणं फार आवश्यक आहे. अनेकदा शेतकरी बांधव कामात व्यस्त राहतात आणि आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याच अनुषंगाने आज आपण हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणते सोपे आणि प्रभावी उपाय करता येतील हे पाहूया.
नियमित व्यायाम
शेतकरी बांधव मेहनतीचे काम करतात, पण तरीही शरीराला संतुलित आणि नियमित व्यायामाची गरज असते. आठवड्यात किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम (जसे की जलद चालणे, सायकलिंग) किंवा ७५ मिनिटे उच्च तीव्रतेचा व्यायाम (धावणे, झपाट्याने चढणे) गरजेचा आहे. यामुळे हृदय मजबूत राहते, रक्ताभिसरण सुधारते आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
पोषक आहार
शरीराला चांगले अन्न मिळाले म्हणजे औषध मिळाले. यासाठी आपल्या आहारात भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये (जसे की ज्वारी, बाजरी, नाचणी), डाळी, नट्स आणि बियांचा समावेश करा. तर प्रक्रिया केलेले अन्न, साखर, तळलेले पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स आणि जास्त मीठ टाळा.
उगाच वाढलेलं वजन, आजारांना आमंत्रण
बॉडी मास इन्डेक्स (BMI) योग्य ठेवणं आवश्यक आहे. विशेषतः पोटाभोवती वाढलेली चरबी हृदयासाठी घातक असते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य झोप यामुळे वजन योग्य मर्यादेत ठेवता येतं.
शांत मन, सुदृढ हृदय
जास्त रक्तदाब (१२०/८० mmHg पेक्षा जास्त) असल्यास हृदयावर ताण येतो. त्यामुळे दर काही महिन्यांनी रक्तदाब तपासावा. तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा छंद जोपासणं उपयुक्त ठरतं. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या आणि स्वतःहून बंद करू नका.
साखर नियंत्रण
मधुमेह हृदयविकाराच्या जोखमीला वाढवतो. जास्त साखर, साखरयुक्त पेय पदार्थ, गोड खाणं कमी करा. नियमित रक्तातील साखर तपासणं गरजेचं आहे. पालेभाज्या, गव्हाचे उत्पादने, डाळी खाण्यामुळे साखर नियंत्रणात राहते.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
तंबाखू, सिगारेट, बीडी, गुटखा यांचा वापर पूर्णतः बंद करणे हेच हृदयासाठी सर्वोत्तम आहे. तसेच, अल्कोहोलचं सेवन शक्यतो टाळा किंवा खूप मर्यादित ठेवा.
काही सोपे उपाय
दिवसातून ७–८ तास झोप घ्या. पाणी भरपूर प्या, शरीर हायड्रेट ठेवा
हेही वाचा : आरोग्यदायी स्ट्रॉबेरी वाढविणार रोगप्रतिकारशक्ती; वाचा गुणकारी फायदे