Farmers Safety : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून त्यासोबतच विजांचा (Lightning strikes) कडकडाटही वाढत आहे. अशा वातावरणात विजा कोसळण्याचा धोका वाढतो आणि त्यामुळे शेतकरी, गुरेढोरे व सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन करत शेतकरी व नागरिकांना स्वतः ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.(Farmers Safety)
विजा (Lightning strikes) पडत असताना शेतकऱ्याने त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. जर सुरक्षित ठिकाण उपलब्ध नसेल, तर उंच ठिकाणी थांबणे टाळावे. झाडाखाली उभे राहणे किंवा विद्युत पोल, पत्र्याचे शेड यांसारख्या ठिकाणी जाणे टाळावे.
शेतात काम करत असल्यास, सुरक्षित ठिकाणी जाण्यास वेळ नसेल, तर दोन्ही पाय गुडघ्या जवळ घेऊन खाली बसा आणि कानावर हात ठेवा.
विजा पडताना अशी घ्या काळजी
सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या : विजा चमकत असल्यास शक्य तितक्या लवकर बंद इमारत, घर, शेड किंवा गुहेसारख्या सुरक्षित ठिकाणी जा.
झाडाखाली किंवा उंच ठिकाणी थांबू नका : झाडाखाली, विद्युत पोल, पत्र्याचे शेड यांसारख्या उंच ठिकाणी उभे राहणे धोकादायक असते.
धातूच्या वस्तूंना स्पर्श करू नका : छत्री, चाकू, काठी, भांडी अशा धातूच्या वस्तूंपासून दूर राहा.
गर्दी करणे टाळा: विजा जमिनीवर पडल्यास ती वीज आसपासच्या लोकांमध्ये पसरू शकते. त्यामुळे एकत्र उभे राहू नका.
घरात असाल तर : खिडक्या-दारे बंद ठेवा. विद्युत उपकरणे बंद करा. संगणक, टीव्ही, फोन, इंटरनेट यांचा वापर टाळा. पाण्याशी संबंधित काम नळ, सिंक, बाथटब यांच्याजवळ जाणे टाळा.
शेतात असताना काय करावे? शेतात सुरक्षित ठिकाणी जायला वेळ नसेल, तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसा, कानांवर हात ठेवा आणि शक्यतो शरीराचा भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक किंवा इतर साहित्य ठेवा.
अपघात झाल्यास काय करावे?
वीज लागल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
आपत्कालीन स्थितीत अग्निशमन दल, पोलीस वा आरोग्य सेवा यांना तत्काळ माहिती द्या.
विजेपासून बचावासाठी 'हे' करा उपाय
हवामानाचा अंदाज पहा : वादळ, विजांचा धोका असल्यास हवामान विभागाच्या सूचना वेळेवर जाणून घ्या.
शेतात काम करताना सावधगिरी बाळगा : विजांचा अंदाज असल्यास शेतात काम टाळा.
गुराढोरांची काळजी घ्या : पावसामुळे नाले, ओढे अचानक भरून वाहू शकतात. अशा वेळी जनावरांनाही सुरक्षित जागी ठेवा.
नागरिकांनी झाडाखाली थांबणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी तात्काळ आश्रय घ्यावा, अशी सूचना केली आहे. वीज कोसळताना थोडीशी सावधगिरी महत्त्वाची असते आणि तीच आपला जीव वाचवू शकते, हे विसरू नये. - चंद्रकांत शेळके, तहसीलदार, बीड
हे ही वाचा सविस्तर : cultivation: शेतात घाम, मनात आशा; खरीपासाठी 'मशागत' घाई! वाचा सविस्तर