कडधान्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत मानले जातात; परंतु मागील काही वर्षांत शेतकरी नगदी पिकांकडे वळल्याने कडधान्याचे क्षेत्र कमी झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कडधान्याचे सरासरी ८५४ हेक्टर क्षेत्र असताना ६१ टक्के म्हणजे केवळ ५२२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शिवाय तेलवर्गीय पिकांचेदेखील क्षेत्र कमी होत असल्याने भविष्यात खाद्यतेलांसह डाळीचे दरवाढ कायम राहणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे रब्बी हंगामाची पेरणी उशिरापर्यंत सुरू आहे. आतापर्यंत रब्बी हंगामाची ८५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यात गहू पिकाची ८६ टक्के, हरभरा पिकाची ७१ टक्के, मका पिकाची ८३ टक्के, ज्वारीची ६८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
थंडी चांगली पडत असल्याने पुढील काही दिवसांत गहू, मका आणि हरभऱ्यांचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ५ लाख ४४ हजार ३६० हेक्टर क्षेत्र असून, यापैकी यंदा ३ लाख ९४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ज्वारी पिकाच्या सरासरी १ लाख ६२ हजार ९०९ हेक्टर क्षेत्रांपैकी १ लाख १२ हजार २७८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
गहू पिकाचे सरासरी १ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र असताना आतापर्यंत १ लाख ११ हजार ११२ हेक्टर पेरणी झाली आहे. हरभरा पिकाच्या सरासरी १ लाख १ हजार ६१० हेक्टर क्षेत्रापैकी प्रत्यक्षात ७६ हजार ५१८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर मका पिकाचे ४८ हजार २८१ हेक्टर क्षेत्र असताना ३९ हजार ९२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तेलवर्गीय पिकांचे क्षेत्र घटले
जिल्ह्यात करडईचे सरासरी १९७ हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी केवळ २० हेक्टरवर झाली आहे. जवसाची सरासरी ४० हेक्टर आहे. परंतु प्रत्यक्ष पेरणी ५ हेक्टरवर झाली आहे. तीळ पिकाचे सरासरी १८९ हेक्टर असताना १८ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. सूर्यफूल पिकाचे सरासरी १०८ हेक्टर असताना प्रत्यक्ष १४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
नवीन ऊस लागवड ५६ टक्के
अहिल्यानगर जिल्ह्यात साखर कारखाने आणि पूरक हवामान असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी रब्बी हंगामात उसाची चांगली लागवड होते; परंतु यंदा ५६ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. जिल्ह्यात सरासरी २४ हजार ६९३ हेक्टर क्षेत्र असताना ५३ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
