Join us

शेतकऱ्यांनी कोथिंबिरीच्या शेतात फिरवला नांगर तर मेथीमध्ये सोडली जनावरं; वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:46 IST

Vegetable Farming : शेतामध्ये राबून मोठ्या कष्टाने घेतलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचे परिसरातील भाजीपाला उत्पादकांना आढळून आले आहे. त्यामुळे निराश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकेच नष्ट केली आहेत.

राजापूर : शेतामध्ये राबून मोठ्या कष्टाने घेतलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचे परिसरातील भाजीपाला उत्पादकांना आढळून आले आहे. त्यामुळे निराश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकेच नष्ट केली आहेत. एका शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या शेतामध्ये नांगर फिरविला तर दुसऱ्या शेतकऱ्याने मेथीच्या शेतामध्ये जनावरे सोडून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

राजापूर (ता. येवला) येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र देवराम वाघ यांनी कोथिंबीर लागवड केली होती. ती कोथिंबीर काढणीस आली व बाजारात ती कवडीमोल भावाने विक्री झाली. यामुळे त्यांचा संताप अनावर झाला, राजेंद्र वाघ यांनी मनमाड बाजार समितीत कोथिंबीर विक्रीसाठी नेली असता तेथे त्यांना कमी दर मिळाला. तेथून घरी आल्यावर त्यांनी कोथिंबिरीच्या शेतात नांगर फिरवला. होणारा खर्च आणि एकरी उत्पादन खर्च याचा मेळ बसत नसल्याने या शेतकऱ्याने पीकच नष्ट केले आहे.

पीक घेण्यासाठी भांडवल लागते. पुढे बाजारभाव मिळाला तर ठीक नाहीतर, केलेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण होतात. या भागातील शेतकऱ्यांची शेती निसर्गाच्या भरवशावर असून, कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात सध्या विहिरींनी तळ गाठला आहे.

त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली; मात्र, डिसेंबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्याने गहू पीक कसे घ्यायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

येथील दुसरे शेतकरी सुदाम पुंडलिक वाघ यांनी एक बिघा क्षेत्रामध्ये मेथीची लागवड केली होती. मात्र, मेथीला खूपच कमी दर मिळत असल्याने त्यांनी मेथीच्या पिकात जनावरे सोडली आहेत. पीक पेरणीपासून मशागत, लागवड खर्च, मजुरी, खते, औषधे यांची महागाई झाली असताना नफा मिळत नसल्याने निराश होऊन राजेंद्र वाघ व सुदाम वाघ यांनी पीकच नष्ट केले आहे.

मी मेथी लागवड केली होती. ती काढली व बाजारभाव कमी झाले. कांदा, भाजीपाला याचेही बाजारभाव उतरले असल्याने केलेला खर्चही वसूल होत नाही. - सुदाम वाघ, शेतकरी राजापूर.

शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी त्याला आपला उदरनिर्वाह करताना अनेक अडचणी येतात. - राजेंद्र वाघ, शेतकरी राजापूर.

हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारनाशिकभाज्या