फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील ३९९८ शेतकऱ्यांना ३८१.२२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर डीबीटी पोर्टलद्वारे वर्ग केली जाणार आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून, एकूण ३,९८,६०३ शेतकरी बाधित झाले आहेत. जिल्ह्यातही ३९९८ शेतकरी यामुळे बाधित झाले होते. राज्य सरकारने केंद्र सरकारने मान्य केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण आणि आकस्मिक आग, यांसारख्या स्थानिक आपत्तींनाही शासकीय मदतीच्या चौकटीत समाविष्ट केले आहे.
यामुळे स्थानिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही आता अधिक प्रभावीपणे मदत मिळू शकणार आहे. या निधीवर कोणत्याही प्रकारची वसुली करू नये किंवा तो निधी कर्ज खात्यात वळवू नये, यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सूचना बँकांना देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
या निर्णयामुळे अवकाळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, नवीन हंगामासाठी त्यांना तयारी करता येणार आहे. शासनाच्या या पावलामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढणार आहे.
असे मिळणार अर्थसहाय्य
८,५०० - प्रति हेक्टर कोरडवाहू क्षेत्रासाठी१७,००० - प्रति हेक्टर बागायत क्षेत्रासाठी२२,५०० - प्रति हेक्टर बहुवार्षिक फळपिके क्षेत्रासाठी
निधी आणि क्षेत्र
१,८७,०५३ - हेक्टर राज्यातील बाधित क्षेत्र३,९८,६०३ - बाधित शेतकरी संख्या३३,७४१.५३ - वितरित करण्यात येणारा निधी