अकोला : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज(electricity) पुरवठ्यामुळे शेतकर्यांची(farmers) मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकर्यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत ०३ मेगावॉट क्षमता असलेला अकोला जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प पातूर तालुक्यातील पांगरा येथे, तर २ मेगावॉट क्षमता असलेला तिसरा सौर प्रकल्प मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे कार्यान्वित करण्यात आला आहे.
या दोन प्रकल्पांमुळे या जिल्ह्यातील १०२४ शेतकऱ्यांना आता अहोरात्र वीजपुरवठा सुरू झाला आहे. याअगोदर जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील जलालाबाद येथील ३ मेगावॅट क्षमता असलेला सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्यामुळे ४५२ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. आतपर्यंत जिल्ह्यात जलालाबाद ३ मेगावॉट, पांगरा ३ मेगावॉट आणि माना २ मेगावॉट असे एकूण ८ मेगावॉट क्षमता असलेले ३ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.
जिल्ह्यात ६७ प्रकल्प
राज्यात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरूपात सौरऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्यात येत आहेत. जिल्ह्यात २०४ मेगावॉट वीजनिर्मितीसाठी ६७ सौर प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होईल.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात आतापर्यंत आठ मेगावॉट क्षमतेचे तीन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. येत्या वर्षभरात आणखी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळू शकेल. - अजितपालसिंह दिनोरे, अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, महावितरण