Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारी, मका खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड; पोलिस बंदोबस्तात प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:17 IST

मका आणि ज्वारी खरेदीसाठी नावनोंदणीच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी शेतकऱ्यांमध्ये गोंधळ झाला. मोठ्या संख्येने शेतकरी दाखल झाल्याने प्रशासनाचीही पळापळ झाली आणि गर्दी आवरणे कठीण झाल्याने अनेक ठिकाणी टोकन पळवण्याचेही प्रकार घडले.

जळगाव जिल्ह्याच्या विविध भागात मका आणि ज्वारी खरेदीसाठी नावनोंदणीच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी शेतकऱ्यांमध्ये गोंधळ झाला. मोठ्या संख्येने शेतकरी दाखल झाल्याने प्रशासनाचीही पळापळ झाली आणि गर्दी आवरणे कठीण झाल्याने अनेक ठिकाणी टोकन पळवण्याचेही प्रकार घडले.

दरम्यान, पारोळा, जामनेर, एरंडोल आदी भागात दुसऱ्या दिवशी, बुधवारी ही प्रक्रिया शांततेत राबवण्यात आली. भडगावात मात्र पहिल्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर बुधवारी नावनोंदणी बंद होती.

जामनेरमध्ये ज्वारी खरेदी नोंदणीला सुरुवात; शेतकऱ्यांची मोठी गर्दी

जामनेर : शेतकरी सहकारी संघाकडून ज्वारी खरेदीसाठी नोंदणी प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही शेतकरी मध्यरात्रीपासून शेतकी संघाच्या कार्यालयाबाहेर मुक्काम करून होते.

सकाळी वाढती गर्दी लक्षात घेऊन गोंधळ टाळण्यासाठी शेतकऱ्यांना टोकन वाटप करण्यात आले. त्यानंतर टोकन नुसार ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. दिवसभरात सुमारे ४५० ते ५०० शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याची माहिती संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर यांनी दिली

दरम्यान, नोंदणीसाठी आवश्यक असलेले सातबारा व खाते उतारे मिळविण्यासाठीची डिजिटल सेवा संकेतस्थळ गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पारोळ्यात दुसऱ्या दिवशी १७७३ शेतकऱ्यांना टोकन

शासकीय ज्वारी-मका खरेदीसाठी नोंदणी प्रक्रियेला दुसऱ्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर प्रशासनाने योग्य नियोजन करत प्रक्रिया सुरळीत केली असून, दुसऱ्या दिवशी तब्बल १७७३ शेतकऱ्यांना नोंदणीसाठी टोकन देण्यात आले.

त्यामुळे एकूण नोंदणीची संख्या १९३० वर पोहोचली आहे. पहिल्या दिवशी गर्दी व वादाच्या पार्श्वभूमीवर केवळ १५७ अर्ज स्वीकारण्यात आले होते. मंगळवारी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता.

पहाटे पाच वाजेपासून शेतकरी रांगेत उभे

• पारोळ्यात गोंधळानंतर अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांनी संचालक मंडळासोबत चर्चा करून नोंदणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपाययोजना केल्या.

•  त्यानुसार, दुसऱ्या दिवशी शासकीय धान्य गोदामाच्या मोकळ्या जागेत नोंदणी सुरू करण्यात आली. पहाटे ५ वाजल्यापासूनच शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहिले होते.

• शेतकऱ्यांनीही कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी स्वयंप्रेरणेने काळजी घेतली. सकाळी साडेआठ वाजता नोंदणीला सुरुवात झाली आणि दिवसभर प्रक्रिया सुरळीत पार पडली.

•  ऑनलाईन पोर्टल एक-दोन दिवसात सुरू होण्याची शक्यता असून, ऑफलाईन टोकनवर दिलेल्या तारखेनुसार शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने बोलावून नोंदणी केली जाणार आहे.

• दिलेल्या दिवशी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघाचे अध्यक्ष भय्यासाहेब पाटील, सचिव भरत पाटील व संचालक मंडळाने केले आहे. नोंदणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोउनि विजय भोंबे, चंद्रसेन पालकर, सुनील पाटील यांनी बंदोबस्त ठेवला होता.

एरंडोल तालुक्यात ५९३ शेतकऱ्यांचे अर्ज जमा

• एरंडोल येथे ८ एप्रिल २०२६ रोजी ज्वारी खरेदी केंद्रावर ५९३ शेतकऱ्यांची ऑफलाइन अर्ज जमा झाल्याची माहिती केंद्राच्या सूत्रांनी दिली.

• बुधवारी सकाळपासून शेतकऱ्यांनी ऑफलाइन नोंदणीसाठी गर्दी केली होती. नोंदणीचे कामकाज शांततेने पार पडले.

हेही वाचा : पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड; विक्रमी उत्पादन घेत फायद्याची शेती करणारे सुधारकराव

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Rush for Jowar, Maize Registration; Police Secure Process

Web Summary : Jalgaon farmers flocked to register for jowar and maize, causing chaos. Token distribution issues arose. Later, registration was peaceful with police security, except in Bhadgaon. Farmers faced portal issues.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डजळगाव