Pune : "तुम्ही जी शेती करता त्यामध्ये तुमच्या काय अडचणी आहेत त्या सांगा, आम्ही इथे सोडवायलाच बसलो आहेत" असे आश्वासन देत कृषीमंत्र्यांनी आज दिवसभर शेतकऱ्यांशी संवाद साधला. तिथेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या अन् कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून विषय मार्गी लावण्याचे किंवा त्यावर पुढे विविध विभागासोबत बैठका घेण्याचे नियोजन कृषीमंत्र्यांनी केले.
कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सदर परिसंवादामध्ये पुणे विभागातील पुणे ,सोलापूर व अहिल्यानगर या जिल्ह्यांमधील ऊस, डाळिंब, द्राक्ष, केळी, केळी, अंजीर, सिताफळ तसेच भाजीपाला इत्यादी प्रमुख पिकांचा तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेती, संरक्षित शेती व अन्नप्रक्रिया उद्योग इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आला होता.
उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन, निर्यात तसेच प्रक्रिया इत्यादी बाबतच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तंत्रज्ञान तसेच कृषी विभागामधील योजना, संशोधन वेगवेगळे प्रकल्प यामध्ये अवलंबवयाचे धोरण व त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
खरीप आढावा बैठकीनंतर राज्याचे कृषीमंत्री यांनी विभागवार बैठका घेऊन प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आज पुण्यात विभागीय कृषी स्तरावरील बैठक पार पडली असून यामध्ये कृषी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, विविध पिकांमध्ये उल्लेखनीय काम करणारे शेतकरी, निर्यातदार, प्रक्रिया उद्योजक, विद्यापीठाचे संशोधक यांचा सामावेश होता.
यामध्ये शासन स्तरावर कृषी विभागामार्फत करावयाचे धोरणात्मक बदल, त्याचबरोबर राज्य शासनाच्या इतर विभागामार्फत ज्या काही सुधारणा किंवा बदल करावयाचे आहेत त्याबाबतचा पाठपुरावा तसेच केंद्र सरकारकडे आवश्यक तो पाठपुरावा कृषी विद्यापीठ व संशोधन संस्थांमार्फत संशोधनांमध्ये आवश्यक असणारे बदल याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी तसेच निर्यातक्षम उत्पन्न घेण्यासाठी जे काही सकारात्मक बदल शासन स्तरावर करणे आवश्यक आहे त्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी सर्व शेतकऱ्यांना सकारात्मक बदल करण्याबाबत आश्वस्त केले.
ऊस पिकांच्या बाबतीमध्ये एकरी उत्पादकता वाढविणे नवीन वाणांचा प्रचार व प्रसार ,डाळिंबाच्या बाबतीमध्ये उच्चतम दर्जाचे लागवड साहित्य, केळी पिकाच्या बाबत नवनवीन वाण तसेच द्राक्ष पिकाच्या बाबत लागवड साहित्य व इतर निविष्ठांबाबत सनियंत्रण अशाच प्रकारे सर्व पिकांबाबत सविस्तर चर्चा करून वरील सर्व पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, ठिबक सिंचन अनुदान इतर उच्चतम तंत्रज्ञान याबाबत आवश्यक ते बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली.