Pune : "शेतीच्या कमी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने विविध योजनेंतून शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याचा विचार केला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून शेततळ्यापासून कृषी यांत्रिकीकरणापर्यंत शेतकऱ्यांना लाभ दिला. कृषी उद्योजकता, मॅग्नेट प्रकल्पातून शेतकऱ्यांची समृद्धी, ड्रोन दिदी यातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात शेतकऱ्यांना फायदा होतोय" असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुण्यातील कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग तंत्रज्ञान संस्थेतर्फे (अटारी) शेतकरी सन्मान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, संस्थेचे संचालक एस. के. रॉय उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मध्यप्रदेशमध्ये देशातील कृषीचा सर्वांत जास्त ग्रोथरेट ज्यांनी ठेवला असे शिवराजसिंह चौहान देशाचे कृषीमंत्री म्हणून लाभल्यामुळे केंद्रीय योजना आपल्यापर्यंत पोहचणार आहेत."
याबरोबरच केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही भाषणात महाराष्ट्राच्या शेतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला भरघोस निधी देण्यात येण्याचे आवाहन केले. त्याबरोबरच देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा संकल्प केला असून ते काम माझ्यावर सोपवले आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. त्याबरोबरच महाराष्ट्राने एक रूपयांत पीक विमा योजना राबवल्याचे त्यांनी कौतुक केले.
राज्याला मिळणार २० लाख घरे
पंतप्रधान आवास योजनेत महाराष्ट्रातील बेघरांसाठी यंदा ६ लाख ३६ हजार ८९ घरे उपलब्ध करून दिली आहेत. या योजनेतील काही निकषांमुळे गरिबांना घरे मिळत नव्हती. त्यामुळे पात्रतेचे निकष शिथिल करण्यात आले असून, पंतप्रधान आवास प्लस योजनेत यंदा महाराष्ट्रासाठी १३ लाख २९ हजार ६७८ घरे अशी एकूण सुमारे २० लाख घरे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी व ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.
लाडकी बहीण योजनेचा हफ्ता लवकरच
लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता येणाऱ्या दोन-चार दिवसांत जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकार परिषदेत दिली आहे.