Join us

धान खरेदी केंद्रांवर लिमिटच्या अडचणीमुळे शेतकरी हवालदिल; लिमिट वाढवण्याची होतेय मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 20:18 IST

सरकारी धान खरेदी केंद्रांवर सध्या शासनाच्या निर्धारित मर्यादा (लिमिट) पूर्ण झाल्यामुळे धान खरेदी ठप्प झाली आहे. या परिस्थितीमुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विकण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक व मानसिक ताण वाढला आहे.

भंडारा जिल्ह्यातील अनेक सरकारी धान खरेदी केंद्रांवर सध्या शासनाच्या निर्धारित मर्यादा (लिमिट) पूर्ण झाल्यामुळे धान खरेदी ठप्प झाली आहे. या परिस्थितीमुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विकण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक व मानसिक ताण वाढला आहे.

अनेक केंद्रांवर 'धान खरेदीची लिमिट संपली' असा फलक लावण्यात आला असून, शेतकऱ्यांना नोंदणीनंतरही धान विकता येत नाही. काही शेतकरी अनेक दिवस ट्रॅक्टर, बैलबंडी घेऊन केंद्राबाहेर उभे आहेत. धान विक्री न झाल्यामुळे कर्जाची परतफेड अडकली असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बोनस मिळण्याची प्रक्रिया केवळ विक्री केलेल्या शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित आहे.

शेतकऱ्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासनाकडे धान खरेदीची लिमिट तातडीने वाढवावी, असा आग्रह धरला आहे. शासनाने केंद्रांना ज्या प्रमाणात नोंदणी झाली आहे, त्या प्रमाणात खरेदीची मर्यादा द्यावी व खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. शासनाने या समस्येवर तातडीने उपाय न केल्यास शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

धान साठवण्याची अडचण

शेतकऱ्यांना राहण्यासाठीच सोयीची जागा नसताना आता धान साठवून ठेवायचा कसा, हा प्रश्न आहे. धान साठवण्यासाठी जागा व साधनसामग्रीचा अभाव असून, हवामानातील बदलामुळे धान खराब होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. पावसाळा असल्याने अडचण तातडीने समजून घेण्याची गरज आहे.

भंडारा जिल्ह्यातील शेतकरी धान खरेदी केंद्रांवरील लिमिटच्या अडचणीमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. शासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन, खरेदीची मर्यादा वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. - ठाकचंद मुंगुसमारे, अध्यक्ष, महाकाल संस्था, तुमसर.

हेही वाचा : रेशीम शेती प्रयोगातून चमकले नशीब; संजय नाईकवाडे यांनी निर्माण केला शेतकऱ्यांपूढे आदर्श

टॅग्स :भातविदर्भशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारसरकार