यंदाच्या हंगामात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता रेल्वे तिकीट आरक्षणाप्रमाणे आगाऊ तारीख निश्चित करावी लागणार आहे.
हमी दराने कापूस विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडे जाण्यापूर्वी किमान तीन दिवस आधी स्मार्टफोनद्वारे 'कपास किसान' या ॲपमधून स्लॉट बुक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ज्यानंतर संबंधित दिवशी केंद्रात जागा उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांना पुढील तारखेसाठी स्लॉट निवडावा लागेल. त्यापुढे जाऊन कापूस विक्री होणार आहे. दरम्यान ही संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांना किचकीट ठरत आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीत भर
'सीसीआय'चे उद्दिष्ट शेतकऱ्यांना हमी दर देणे असले, तरी प्रत्यक्षात ही तांत्रिक यंत्रणा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शासनाने या ऑनलाइन प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केंद्रे उभी करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कपास किसान ॲपवर मंजुरी मिळाल्यानंतर व स्लॉट बुक केल्यानंतरच शेतकऱ्यांना कापूस विक्री करता येणार आहे.
ॲपद्वारे बुकिंग नसेल, तर विक्री नाही!
शेतकऱ्यांनी निवडलेल्या दिवशी केंद्रावर इतर विक्रेत्यांची नोंद जास्त असल्यास, ॲपवर 'जागा उपलब्ध नाही' असा संदेश दाखवला जाईल. अशावेळी शेतकऱ्यांना दुसरी तारीख निवडावी लागेल. या तांत्रिक अटींमुळे शेतकऱ्यांना अधिक वेळ आणि कौशल्याची गरज भासणार आहे.
सर्व माहिती ॲपवर !
शेतकऱ्यांना कापूस विक्री केंद्रातील स्थितीची माहिती आता थेट 'कपास किसान' ॲपवरून मिळणार आहे. संबंधित दिवशी त्या केंद्रावर इतर शेतकऱ्यांच्या नोंदींची संख्या जास्त असल्यास, केंद्राची क्षमता तपासली जाईल. क्षमतेपेक्षा अधिक कापूस नोंद झाल्यास ॲपवर 'जागा उपलब्ध नाही' असा संदेश दिसेल. अशा वेळी शेतकऱ्यांना पर्यायी तारखेचे स्लॉट बुक करावे लागेल. त्यानंतरच संबंधित केंद्रात कापूस विक्री करता येईल.
स्मार्टफोन नसलेल्यांची चिंता वाढली!
राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे अध्याप देखील स्मार्टफोन नाही, तसेच ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेची माहितीही कमी आहे. परिणामी, या योजनेतून व्यापाऱ्यांना फायदा तर शेतकऱ्यांना तोटा होण्याची शक्यता आहे. बुकिंग न झाल्यास अनेकांना कापूस खुल्या बाजारात कमी दराने विकावा लागेल.
प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची
• खुल्या बाजाराच्या तुलनेत सीसीआयने कापसाला सुमारे हजार रुपयांनी अधिक दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हमी केंद्राकडे वाढला आहे. मात्र, यावर्षी विक्रीची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक तांत्रिक आणि गुंतागुंतीची झाली आहे.
• सीसीआयकडून प्रथम 'कपास किसान' ॲपवर नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर बाजार समिती 'अप्रूव्हल' देते आणि मग सीसीआय अंतिम मंजुरी देते.
