Join us

Turmeric farming हिंगोलीचे शेतकरी यंदा पुन्हा हळद लागवडीकडे का वळत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 10:45 AM

हळद लागवडीकडे ( Turmeric farming ) हिंगोलीचे शेतकरी का वळत आहे? समोर आलं हे कारण

अरुण चव्हाण

यावर्षी चांगला नाही पण समाधानकारक १५ ते १६ हजार रुपये भाव हळदीला (Turmeric farming) मिळाला. त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात हळदीची लागवड करण्याचा मानस हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार व परिसरातील शेतकऱ्यांनी बोलून दाखविला. शेतकरी दोन दिवसांपासून हळदीच्या बेण्याची शोधाशोध करू लागले आहेत.

गत पाच वर्षांपासून हळदीला बाजारपेठेत चांगला नाही; पण समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरीही हळदीची लागवड चांगल्या पद्धतीने करू लागले आहेत. परंतु निसर्ग काहीवेळा साथ देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी दहा ते बारा गावांतील शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली होती.

परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे काही शेतकऱ्यांना फटका बसला. अशावेळी शासनाने मदत करायला पाहिजे होती; परंतु शासनाची मदतही काही शेतकऱ्यांच्याच खात्यावर पडली. गरीब शेतकरी मात्र तसेच मागे राहिले आहेत. यावर्षी खरीप हंगामात चांगला पाऊस पडणार, असा अंदाज हवामान विभागाने दाखविला असला तरी प्रत्यक्षात पाऊस पडल्याशिवाय काही खरे नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गतवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळाबाजार, असोला, कोंडशी, नालेगाव, पोटा, आजरसोंडा, तपोवन, करंजाळा, बोरी, आडगाव (रंजे), कळंबा, गुंडा, रांजाळा आगी परिसरात हळदीचे मोठे क्षेत्र वाढेल, असे पहायला मिळत आहे. यंदा शेतकऱ्यांनी हळदीचा पेरा अधिक घेतला तर कमीत कमी शेतकऱ्यांच्या हळदीला २० हजार रुपये तरी भाव द्यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मशागत करणे शेतकऱ्यांनी केले सुरु

गत हंगामात अनेक शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली. बऱ्यापैकी उत्पन्न हळदीचे शेतकऱ्यांना झाले. हळदीला भावही चांगला मिळाला. त्यामुळे यावर्षी शेती मशागतीची कामे शेतकरी लगबगीने करू लागले असून हळदीची लागवडही करत आहेत. शेतकरी नांगरटी केलेल्या शेताला रोटर करून त्यावर बेड मारत आहेत. बेड मारल्यानंतर शेतकरी ठिबक अंथरून हळद लागवडीची तयारी करू लागले आहेत. शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. आता फक्त मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

महागाईच्या मानाने १६ हजार रुपये भाव काहीच नाही

महागाईने कळस गाठला आहे. हळद लागवड व काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. सर्व सोपस्कार केल्यानंतर हळद बाजारात नेली तर भाव १२ ते १६ हजार रुपये मिळत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना घर चालविणे कठीण होत आहे. कमीत कमी २० हजार रुपये तरी हळदीला भाव द्यावा. - सुरेश चव्हाण, आडगाव रंजे, शेतकरी.

हळद बाजारपेठेत आणल्यानंतर काही व्यापारी एक-दोन हळदीच्या ठेल्याला पाहून भाव ठरवितात. परंतु एक, दोन ढेला न पाहता सरसकट हळदीला भाव द्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हळदीला लागलेला खर्च निघून काहीतरी मुनाफा त्यांच्या पदरी पडेल आणि शेतकरी सुस्वी होईल. शासनाने यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. - विशाल दावलबाजे, जवळाबाजार, शेतकरी.

हेही वाचा - Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग

टॅग्स :शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनहिंगोलीमराठवाडाविदर्भ