Join us

आधुनिक पीक पद्धतीने शेतकरी होतोय समृद्ध; आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:31 IST

Strawberry Farming : अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग राबवत आहेत. तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील चार गावांतील निवडक शेतकऱ्यांनी आपल्या दोन ते पाच गुंठे क्षेत्रात सुमारे तीन महिन्यांत चाळीस हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले.

प्रकाश महाले 

अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग राबवत आहेत. तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील चार गावांतील निवडक शेतकऱ्यांनी आपल्या दोन ते पाच गुंठे क्षेत्रात सुमारे तीन महिन्यांत चाळीस हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले.

यामुळे आपल्या भागात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेता येऊ शकते, असा विश्वास या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

अलीकडे आदिवासी भागातील शेतकरी आपल्या पारंपरिक शेती पद्धतीत बदल करत आहेत. या परिसरात कार्यरत असलेली विविधे फाउंडेशन तथा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आता शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करू लागला आहे.

बायफ संस्थेने मुरशेत, बारी, जहागीरदार वाडी, चिचोंडी, पेंडशेत आणि पांजरे येथील १८ शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची रोपे, मल्चिंग पेपर, खते, औषधे पुरतली. शेतकऱ्यांना रोपे लागवडीपासून व्यवस्थापन आदी मार्गदर्शन केले गेले.

शेती पद्धतीत बदल, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

• अकोल्यातील पाच गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीत उल्लेखनीय यश मिळवले. १८ शेतकऱ्यांनी प्रत्येकी २ ते ५ गुंठ्यांवर 'विंटर डॉन' या प्रजातीची लागवड केली. प्रति शेतकरी एक ते अडीच हजार रोपांची उपलब्धता करून देण्यात आली.

• जागेवरच २०० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी बाहेरच्या बाजारपेठेत पाठवून अधिकचा भाव मिळवला. सेंद्रिय निविष्ठांच्या आधारे उत्पादन घेतल्याने स्ट्रॉबेरीची चव उत्कृष्ट असल्याचे ग्राहकांनी कळवले. असे प्रकल्प प्रमुख विष्णु चोखंडे यांनी सांगितले.

पुढील वर्षी कळसूबाई, हरिश्चंद्रगड, भंडारदरा, विश्रामगड, रंधा धबधबा या पर्यटन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागातर्फे विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून स्ट्रॉबेरीची प्रात्यक्षिक लागवड करण्याचे नियोजन आहे, जेणेकरून पर्यटनाच्या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. - सचिन गिरी, तालुका कृषी अधिकारी, अकोले.

शेतकऱ्यांचा पुरेपूर फायदा झाला

३ महिने हजारो रुपयांपासून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात येते. खते, औषधे, रोपे, मल्चिंग याचाही पुरवठा करण्यात आला. एकूणच येथील शेतकऱ्यांना याचा पुरेपूर फायदा झाला.

बायफ या संस्थेने हे पीक घेण्यासाठी आम्हाला उभारी दिली. रोपांपासून मल्चिंग पेपर, खते, औषधे आदी लागणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध करून दिल्या. दर आठवड्याला करावयाची कामे आदींचे मार्गदर्शन केले. केवळ मशागत आमच्याकडे होती. ऑक्टोबर महिन्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली. - सुरेश गभाले, चिचोंडी ता. अकोले. (स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी).

थोडीफार रोपांची मर झाली. मात्र, उरलेली रोपे तरारून आल्यानंतर स्ट्रॉबेरीची फळे चांगली लगडली. मार्केटिंग हा महत्त्वाचा प्रश्न सुरुवातीला होता. मात्र, परिसरात येणाऱ्या पर्यटकांना आमच्या स्ट्रॉबेरीची चव आवडली. चार महिन्यांत आमच्या शेतकऱ्यांना ४० हजारांपासून एक लाखापर्यंत उत्पन्न मिळाले. - नवनाथ खाडे, बारी, ता. अकोले. (स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी).

हेही वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्यासाठी गुणकारी 'गवती चहा'

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीफळेअहिल्यानगरपीक व्यवस्थापनबाजार