सांगली: काही व्यापारी ठरवून परदेशातून बेदाणा आल्याची अफवा पसरवून दर पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्याच्या दरापेक्षा कमी दरात बेदाण्याची विक्री केल्यास शेतकरी रस्त्यावर येऊन 'रास्ता रोको' आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिला आहे.
मारुती चव्हाण म्हणाले, काही व्यापारी जनतेची दिशाभूल करून परदेशातून बेदाणा मोठ्याप्रमाणात आला आहे, असे सांगून दर कमी करत आहेत. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेचा शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.
दोन महिन्यांत बेदाण्याचे दर प्रतिकिलो ५० ते १०० रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या राज्यात बेदाण्याचे उत्पादन खूपच कमी आहेत. तरीही दर वाढत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
म्हणूनच खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन द्राक्ष बागायतदारांनी बेदाण्याचे दर कमी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यासंबंधीचे निवेदनही त्यांना दिले आहे.
यानंतर कोल्हे यांनीही तत्काळ केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे बेदाण्याचे दर कमी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
काही व्यापारी बाहेरच्या देशातील बेदाणा येणार अशा अफवा करून दर कमी आहेत, परंतु द्राक्ष बेदाणा उत्पादक आंदोलनामुळे आयात बेदाणा थांबला आहे.
या आठवड्यात किलोला २५ ते ३० रुपये दरात सुधारणा झाली आहे. या दरात सुधारणा होणे अपेक्षित आहे; पण काही व्यापारी बेदाण्याचे दर मुद्दाम वाढू देत नाहीत.
व्यापाऱ्यांची ही मक्तेदारी थांबली नाही तर राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून 'रास्ता रोको' आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सध्या राज्यात केवळ ५० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. नवीन बेदाणा येण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या बेदाण्यास प्रतिकिलो ५०० रुपये किमान दर मिळणे गरजे आहे.
एवढा दर मिळाला तरच द्राक्ष बागायतदारांना काही प्रमाणात पैसे मिळणार आहेत. नाही तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे वाढते दर पाहिल्यास द्राक्ष शेती अडचणीत आहे, असे मत द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी व्यक्त केले.
छोटे व्यापारीही अडचणीतजून महिन्यात बेदाण्याला प्रतिकिलो ४५० ते ५०० रुपये दर मिळाला होता. भविष्यात आणखी दर वाढतील, म्हणून काही छोट्या व्यापाऱ्यांनी बेदाणा खरेदी करुन ठेवला होता. पण, सद्या दर कमी झाल्यामुळे छोटे व्यापारीही चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत.
अधिक वाचा: साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई