अशोक मोरे
संत्रा, मोसंबीचे झाडे मोठी झाली की फळे आल्यावर त्या झाडाला बांबूने बांधावे लागते. तो खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही किंवा जुनी झाडे काढून नवीन रोपटी लावावी लागतात.
त्यात शेतकऱ्यांचा वेळ वाया जातो. यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या सातवड (ता. पाथर्डी) येथील प्रयोगशील शेतकरी बंडू पाठक यांनी संत्रा झाडांची छाटणी करण्याचे नवीन तंत्र विकसित केले आहे.
पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग संत्रा, मोसंबीचे आगार म्हणून ओळखला जातो. या भागातील प्रत्येक शेतकऱ्याकडे संत्र्याची किमान शंभर तरी झाडे आहेत. संत्रा, मोसंबीची झाडे मोठी झाली की त्याला फळे आल्यावर फळांच्या वजनाने फांद्या वाकून मोडून पडतात. त्यामुळे शेतकरी झाडांच्या फांद्या बांबूने बांधतात.
मात्र, याचा मोठा खर्च असतो. संत्र्यांची झाडे मोठी झाली की दाट फांद्या व पानांमध्ये झाडांच्या खोडांना सूर्यप्रकाश मिळत नाही. याचा परिणाम उत्पादनावर होतो.
संत्र्याची झाडे वीस फुटांपर्यंत उंच गेली की फळे आल्यानंतर फांद्या तुटू नये म्हणून बांबूने बांधावे लागते. फांद्या तुटून फळांसह झाडांचे नुकसान तर होतेच. मात्र, झाडांच्या खोडांना सूर्यप्रकाश न मिळाल्याने उत्पन्न कमी मिळते. अशा प्रकारची छाटणी केल्याने त्याचे नवीन रोपटे तयार झाले होते. - बंडू पाठक, प्रगतशील शेतकरी, सातवड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर.
अशी करतात झाडांची छाटणी...
• दरवर्षी येणारा खर्च व झाडांच्या फांद्या तुटून होणारे नुकसान टाळण्यासाठी सातवड येथील शेतकरी बंडू पाठक यांनी स्वतःचा अनुभव वापरून संत्र्याच्या झाडांची छाटणी खोडापर्यंत केली.
• झाडाच्या सगळ्या उंच गेलेल्या फांद्या छाटून टाकल्याने त्या झाडांची उंची कमी झाली. खोडापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचावा यासाठी त्यांनी झाडांची छाटणी वेगळ्या पद्धतीने केली. या छाटलेल्या झाडांना आता खोडापासून पालवी फुटली आहे.